मुंबई : २१ ते २३ फेब्रुवारीदरम्यान फेब्रुवारीमध्ये राजधानी दिल्लीमध्ये होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्थळाच्या एका प्रवेशद्वाराला स्वातंत्रवीर सावरकरांचे नाव देण्याचा निर्णय शुक्रवारी मुंबईत साहित्य महामंडळ, महामंडळाच्या घटक संस्था व सरहद या आयोजक संस्थेच्या झालेल्या बैठकीत एकमताने घेण्यात आला. साहित्य संमेलन स्थळाला, प्रवेशद्वाराला किंवा व्यासपीठाला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नाव द्यावे, अशी मागणी अनेक सावरकरप्रेमींकडून अनेक दिवसांपासून साहित्य महामंडळ व आयोजकांकडे केली जात होती. या मागणीची अखेर दखल घेण्यात आहे.
शुक्रवारी झालेल्या बैठकित संमेलनाला सावरकर यांचे नाव देण्याबाबत सावरकरप्रेमींनी विविध माध्यमातून आयोजक व महामंडळाकडे केलेल्या मागणीवर सर्वंकष चर्चा झाली. चर्चेअंती असे ठरले की, तालकटोरा मैदानावरील जे मुख्य प्रवेशद्वार असेल त्याला लोकमान्य टिळकांचे नाव देण्यात येईल व मैदानाच्या आत ‘व्हीआयपी’ प्रवेशद्वाराला स्वातंत्र्यवीर सावरकर असे नाव देण्यात येईल.