मुंबई ते नागपूर ८ तासांत

समृद्धी महामार्गाचे १०० टक्के काम पूर्ण ; मार्चमध्ये शेवटच्या टप्प्याचे उद्घाटन होण्याचा अंदाज

    06-Jan-2025
Total Views |

samrudhi


मुंबई, दि.६ : विशेष प्रतिनिधी 
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर- मुंबई समृद्धी महामार्ग या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या रस्ते पायाभूत सुविधा प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इगतपुरी ते मुंबई असा ७६ किलोमीटरचा शेवटचा टप्पा तयार झाला असून तो मार्च २०२५च्या मध्यापर्यंत जनतेसाठी खुला केला जाईल. हा टप्पा सुरु होताच मुंबई ते नागपूर हे अंतर अवघे ८ तासांचे असेल. यामुळे कनेक्टिव्हिटीलाही चालना मिळेल. ७०१ किलोमीटर लांबीचा हा महामार्ग ३ टप्प्यात सुरू करण्यात आला आहे. हा प्रकल्प महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी गेम चेंजर मानला जात आहे.

प्रकल्पाची कामे अंतिम टप्प्यात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) बांधला आहे. एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ अनिल कुमार गायकवाड यांनी यापूर्वी सांगितले होते की, सर्व संबंधित रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यानंतरच या मार्गाचे उद्घाटन केले जाईल. या मार्गाच्या शेवटच्या टप्प्यात अनेक आव्हानात्मक कामांचा समावेश होता. यामुळे ही कामे पूर्ण झाल्यावर या मार्गाचे लोकार्पण करण्यात येईल. आता या मार्गाच्या शेवटच्या टप्प्यातील कामे आता अंतिम टप्पयात आहेत. तर स्थापत्याची १०० टक्के कामे पूर्ण झाले असल्याची माहिती मिळते आहे.

------- 
लांबी- ७०१ किलोमीटर
लेन - ६
वेग- १२० किमी प्रति तास
उड्डाणपूल- ६५
इंटरचेंज - २४
बोगदा- ६
इंधन स्टेशन- ३०
रुग्णवाहिका आणि द्रुत प्रतिसाद वाहन- २१

चौकट २

-८ किलोमीटर लांबीचा हाय-टेक ट्विन बोगदा, जो जर्मन तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे
- वन्यजीव संरक्षणासाठी ८०पेक्षा जास्त संरचना
- १० जिल्ह्यांशी थेट संपर्क
- १४ जिल्ह्यांशी अप्रत्यक्ष संपर्क
- १८ नवीन स्मार्ट शहरे विकसित होणार
- स्थानिक उद्योगांना आणि रोजगाराला चालना

चौकट ३

दोन वर्षांत १.५२ कोटी वाहनांनी प्रवास केला

टोलमधून ११०० कोटींची कमाई