ऑस्ट्रेलियातील मराठमोळा सर्जंट

    06-Jan-2025   
Total Views |
Ashok Ghuge

समोर आलेल्या परिस्थितीचे रुपांतर संधीमध्ये करत, कष्ट, जिद्द आणि सचोटी यांच्या जोरावर ऑस्ट्रेलियामध्ये सर्जंट पदावर कार्यरत असलेल्या अशोक घुगे यांच्याविषयी....

वयाच्या ४१व्या वर्षी पोलीस अकादमीमध्ये लॉ, डिफेन्स टॅक्टिक्स आणि संभाषण कौशल्य या विषयांचे तीन महिन्याचे प्रशिक्षण घेऊन, शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न करत दुसर्‍या प्रयत्नात पोलीस निवड चाचणीत यश मिळविणार्‍या, अशोक घुगे यांनी ऑस्ट्रेलियात थेट पोलीस अधिकारी पदापर्यंत झेप घेतली आहे. सामान्य मराठी कुटुंबातील अशोक घुगे यांचा हा असामान्य प्रवास जितका कठीण आहे, तितकाच प्रेरणादायीही.

मूळच्या नाशिकमधील हिवरे पिंपळे येथील असलेल्या, या घुगे कुटुंबीयांची कल्याण ही कर्मभूमी. अशोक यांचे वडील हरिभाऊ बाळाजी घुगे हे कल्याण स्थानक परिसरात माथाडी कामगार, तर आई हौसाबाई या दूधनाका परिसरातील गोठ्यातील शेण काढून, गवर्‍या बनवायचे काम करीत असे. सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या अशोक यांना, परिस्थितीची जाणीव होती. आपल्या आई-वडिलांनी केलेल्या कष्टाची अशोक आणि इतर मुलांनी केवळ जाणीवच ठेवली नाही, तर कर्तृत्वाने आई वडिलांच्या या काबाडकष्टांना प्रतिष्ठेचे कोंदण प्राप्त करून दिले.

अशोक यांचे सध्या ऑस्ट्रेलियात वास्तव्य असले, तरी त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण कल्याणमधल्या ‘छत्रपती शिक्षण मंडळा’च्या अभिनव विद्यामंदिरमध्ये झाले. मग या शाळेतूनच घडलेल्या इतर असामान्य कर्तृत्ववान विद्यार्थ्यांप्रमाणे अशोक यांच्याही स्वप्नांचा भक्कम पाया रचण्याचे काम, शाळेने आणि त्यातील शिक्षकांनी केले. उल्हासनगरच्या आर.के.टी. महाविद्यालयातून त्यांनी पुढचे शिक्षण घेतले. अंधेरीतील सिमेन्स कंपनीत फिटर ट्रेडमध्ये, तीन वर्षे परेन्टशीप प्रथम क्रमांकाने पास केली. नंतर ’गोडफ्रे फिलिप्स ’ या कंपनीत टेक्निशियन पदावर दिवसा काम करून, रात्री श्री भागुभाई माफतलाल पॉलीटेक्निकमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा पूर्ण केला. त्याच दरम्यान तिथले काही मित्र नोकरीच्या चांगल्या संधी आल्याने ऑस्ट्रेलियाला गेले. त्या मित्रांकडून मग आपल्याला तिकडे रोजगाराच्या चांगल्या संधी असल्याचे समजले. मग आपणही पत्नी कवितासह २००३ सालीच ऑस्ट्रेलिया गाठल्याचे अशोक सांगतात.

ऑस्ट्रेलियाला गेल्यावर सुरुवातीच्या काळात, अशोक यांनी अनेक लहान कंपन्यांमध्ये नोकरी केली. जनरल मोटर्स या वाहन निर्मिती कंपनीमध्ये, त्यांनी साडे आठ वर्षे टीम लीडर म्हणूनही काम केले. सगळे काही सुरळीत सुरू असताना, त्यावेळी आलेल्या जागतिक आर्थिक मंदीच्या फेर्‍यात ती कंपनी सापडली आणि मग तिकडून अशोक यांना स्वेच्छा निवृत्ती घ्यावी लागली. अशोक हे ऑस्ट्रेलियातील मेलबर्न या मेट्रो सिटीमध्ये वास्तव्यास आहेत. जनरल मोटर्समधील नोकरी गेल्याने, काही तरी स्थायी स्वरूपाचे काम मिळावे यादृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू होते. त्याचवेळी मेलबर्नमधील व्हिक्टोरिया पोलीस या शासकीय विभागात भरती सुरू झाली. मात्र, पहिल्या प्रयत्नांत फिटनेस टेस्टमुळे अयशस्वी ठरल्यानंतर नाराज न होता, जोमाने पुन्हा प्रयत्न सुरू केले. स्वतःचा शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी रीतसर प्रशिक्षण घेऊन, मग दुसर्‍यांदा दिलेल्या निवड चाचणीत आपल्याला यश मिळाल्याचे अशोक यांनी सांगितले. वयाच्या ४१व्या वर्षी आपला पोलीस खात्यातील प्रवासाचा श्रीगणेशा झाल्याचेही अशोक सांगतात .

ऑस्ट्रेलियामध्ये ज्यावेळी भारतीय विद्यार्थ्यांवरील हल्ले वाढले होते, त्याची दखल घेत ऑस्ट्रेलियाच्या तत्कालीन पंतप्रधान ज्युलियन गिलार्ड यांनी, महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणांसाठी सुरक्षात्मक सुरक्षा अधिकार्‍यांची विशेष पोलीस पथके तैनात करण्याचा निर्णय घेतला होता. सध्या अशोक हे याच सुरक्षात्मक सुरक्षा अधिकार पथकात, सर्जंट या अधिकारी पदावर कार्यरत आहेत. इतकेच नाही तर भारतीय आणि त्यातही विशेषतः मराठी पर्यटकांसाठी, त्यांनी आपल्या पोलीस युनिफॉर्मवरील नावाच्या प्लेटखाली मी मराठी बोलतो असे लिहिले असल्याचे, त्यांनी अतिशय अभिमानाने सांगितले.

विशेष म्हणजे अशोक हे एकीकडे पोलीस दलातून देशसेवा बजावत आहेत. तर त्यांच्या पत्नी कविता या तिकडे रजिस्टर नर्स असून, गेल्या १५ वर्षांपासून तिथल्या शासकीय रुग्णालयात रुग्णसेवा करीत आहेत. लहान मुलांचे आयसीयू म्हणजेच एनआयसीयुमध्ये त्या लहान मुलांची देखभाल करण्यासाठी, तैनात असतात. तर ऑस्ट्रेलियामध्ये परिचारिकांना विशेष स्थान असून,एखाद्या महत्त्वाच्या पदावरील व्यक्तीप्रमाणे त्यांना मान मिळत असल्याचे अशोक यांनी अधोरेखित केले.
परदेशात राहूनही घुगे कुटुंबीयांनी मराठी मातीशी, मराठी संस्कृती-परंपरांशी नाळ जुळलेली आहे. मेलबर्न महाराष्ट्र मंडळातही अशोक हे तितक्याच उत्साहाने कार्यरत असून, त्यांच्या घरी गणपती, दसरा, दिवाळी असे सगळे सण पारंपरिक पद्धतीने साजरे होत असल्याचे त्यांनी सांगितले.

लहानपणी पारनाका परिसरातील लोकांची लाभलेली संगत, अभिनव शाळेतील शिक्षकांचे मिळालेले मार्गदर्शन आणि आई वडिलांनी केलेले कष्ट, यामुळे आपला प्रवास शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. आई वडिलांचे आणि आपले आयुष्य सुधारायचे आहे, त्यामुळे कष्टाला पर्याय नाही ही गोष्ट ध्यानात ठेवून आपण प्रयत्न करत गेलो आणि आज हे स्थान प्राप्त करू शकलो, अशी प्रांजळ कबुली त्यांनी दिली.

अशोक यांनी अनेक संकटे येऊनही न डगमगता त्यावर मात करत, स्वकर्तृत्वाचा असा कळस चढवला. अशा मेहनती, कष्टाळू व्यक्तिमत्त्वाला पुढील वाटचालीसाठी दैनिक ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा!