चिंताजनक! भारतात आढळला HMPV चा पहिला रुग्ण

    06-Jan-2025
Total Views |
 
HMPV
 
बंगळुरू : (HMPV) चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना व्हायरसप्रमाणे ह्यूमन मेटान्यूमो व्हायरसने थैमान घातले आहे. चीनमधील  एचएमपीव्ही (HMPV) या विषाणूच्या वाढत्या प्रसारामुळे अन्य देशांसह भारतातही चिंता वाढली आहे. अशातच या विषाणूचा संसर्ग झालेला पहिला रुग्ण आता भारतामध्येही आढळून आला आहे. या माहितीनंतर देशपातळीसह राज्यपातळीवरील आरोग्य विभाग सतर्क झाले आहेत.
 
बंगळुरूमधील बाळाला HMPV ची लागण
 
बंगळुरूमध्ये एचएमपीव्ही (HMPV) चा पहिला रुग्ण आढळला असून एका आठ महिन्यांच्या बाळाला या विषाणूची लागण झाली आहे. बंगळुरूच्या खासगी रुग्णालयात याबाबत चाचणी करण्यात आली होती. यामध्ये या लहानग्या बाळाला HMPV चे संक्रमण झाल्याचे समोर आले. खाजगी रुग्णालयाने याबाबत चाचणी केली आहे. सरकारी रूग्णालयानं अद्याप याची कोणतीही चाचणी केली नसल्याचे बंगळुरू आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. यादरम्यान दिल्ली आरोग्य अधिकाऱ्यांनी सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. अधिकाऱ्यांनी एचएमपीव्ही आणि श्वसनासंबंधित व्हायरसशी लढण्यासाठी अधिकृत नियमावली जारी केली आहे आणि रुग्णालयांना सतर्कता बाळगण्याचे आदेश दिले आहेत.
 
ह्यूमन मेटान्यूमो व्हायरसची लक्षणं काय आहेत?
 
एचएमपीव्हीच्या संसर्ग झाल्याची लक्षणे जवळपास कोरोनासारखीच आहेत. या व्हायरसमध्ये सर्दी, खोकला, ताप यासारखी सामान्य लक्षणं आढळून येतात. हा ह्यूमन मेटापन्युमो व्हायरस जीन्सचा आरएनए विषाणू आहे. त्याच्या संक्रमणामुळे लहान मुले आणि वयोवृद्धांना अधिक त्रास होतो.
 
महाराष्ट्रात आतापर्यंत एचएमपीव्हीचा एकही रुग्ण आढळलेला नाही
 
महाराष्ट्रात आतापर्यंत एचएमपीव्हीचा एकही रुग्ण आढळलेला नाही. सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील श्वसनाच्या संसर्गाच्या आकडेवारीचे विश्लेषण केले आहे. वर्ष 2023 च्या तुलनेत डिसेंबर 2024 मध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. तथापी खबरदारीचा एक भाग म्हणून नागरिकांनी श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये या संदर्भातील सूचनांचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
 
HMPV व्हायरसच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी हे करा :
 
- जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंका येत असेल तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाका.
 
- साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुवा.
 
- ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा.
 
- भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा
 
- संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे वायुविजन (व्हेंटीलेशन) होईल, याची दक्षता घ्या.
 
HMPV व्हायरसच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी हे करू नये :
 
- हस्तांदोलन
 
- टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर
 
- आजारी लोकांशी जवळचा संपर्क
 
- डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे
  
- सार्वजनिक ठिकाणी थुंकणे.
 
- डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध (सेल्फ मेडिकेशन) घेणे.