रायपूर (Chhatisgarh IED Blast) : छत्तीसगढच्या बिजापूर जिल्ह्यात सोमवार दिनांक ६ जानेवारीच्या दुपारी नक्षलवाद्यांचा एका गटाने पोलिसांच्या गाडीला लक्ष्य केलं. दांतेवाडा, नारायणपूर आणि बिजापूर इथली नक्षलवाद्यांच्या विरोधातील कारवाई पूर्ण करून परतत असताना बेदरे कुटरू रस्त्यावर पोलिसांच्या वाहनाला लक्ष्य केलं गेलं. बस्तरचे आयजी पी सुंदरराज यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार आयईडी स्फोटकांचा वापर करत हा बॉम्बस्फोट घडवण्यात आला आहे.
बस्तरमध्ये सुरक्षा रक्षकांनी नक्षलवाद्यांचा खात्मा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, नक्षलवाद्यांकडून हा स्फोट घडवून आणण्यात आला आहे, दांतेवाडाच्या परिसरात झालेल्या चकमकीत ४ नक्षलवादी ठार झाले असून, एका जवानाला हौतात्मय पत्करावे लागले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मार्च २०२६ पर्यंत नक्षलवादाचा खात्मा करण्याचा निर्धार केला आहे. २०२४ या वर्षाअखेर एकूण २८७ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आले असून, एकूण १००० नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे. दुसऱ्या बाजूला ८३७ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. केंद्राव्यतिरिक्त, छत्तीसगड सरकारने नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी अनेक धोरणं राबवली आहेत. बंडखोरांची संख्या कमी करत, त्यांचे समाजात पुर्नवसन व्हावं या उद्देशाने ही धोरणं राबवली जात आहे.