भाजपच्या पर्वेश वर्मा यांची मागणी; मुख्यमंत्र्यांना लिहीले पत्र
06-Jan-2025
Total Views |
नवी दिल्ली : दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी आपल्या कार्यकाळात बांधलेला शीशमहल आज वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. अशातच आता भाजपचे नेते पर्वेश वर्मा यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांना पत्र लिहीत म्हटले की केजरीवालांचा शीशमहल जनतेसाठी खुला करण्यात यावा. त्यांनी आपल्या पत्रात असे नमूद केले आहे की शीशमहाल बांधण्यासाठी तब्बल ३३ कोटी रूपयांचा खर्च करण्यात आला आहे. या शीशमहलात महागडे पडदे लावले गेले, तसेच स्पेशल मार्बेल बसवण्यात आले.
आपल्या पत्रात पर्वेश वर्मा यांनी म्हटले आहे की ही आता केवळ एक वास्तु राहिली नसून, दिल्लीच्या शासन प्रशासनाच्या इतिहासाचं महत्वपूर्ण प्रतिक बनली आहे. जनतेच्या निदर्शनास ही गोष्ट आणून दिली पाहिजे की त्यांनी निवडलेला लोकप्रतिनीधी कशा रितीने इथे ऐशोआरामात जगत होता. सकाळी १० वाजल्यापासून ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत जनतेच्या दर्शनासाठी हा शीशमहाल खुला ठेवण्यात यावा. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार CAG च्या अहवालानुसार केजरीवालांच्या बंगल्याच्या रेनोवेशनचे काम २०२० साली सुरू झाले होते. त्यावेळेस याचा खर्च ७.९ कोटी रूपये इतका होता. मात्र, २०२२चं वर्ष उगवेपर्यंत हा खर्च तब्बल ३३ कोटी रूपये इतका झाला. रेनोवेशनचा खर्च वाढण्यामागचं प्रमुख कारण म्हणजे किंमतीने महाग असलेल्या वस्तू खरेदी करण्यात आल्या होत्या. २ वर्षांच्या कार्यकाळात सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तब्बल ५ वेळा अंदाजपत्र सादर केले असल्याची माहिती माध्यमांना मिळाली आहे. CAG च्या अहवालानुसार १.८७ कोटी रूपयांचा खर्च हा केवळ बाथरूमसाठी करण्यात आला आहे. मोड्युलर किचनसाठी ६५ लाख रूपयंचा खर्च करण्यात आला आहे. इतकेच नाही तर ३ ते ५ कोटी रूपयांचा खर्च हा केवळ हँडल्सवर करण्यात आला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. CAG चा अहवाल अद्याप दिल्लीच्या विधानसभेत सादर झालेला नाही, परंतु यातील काही माहिती जनतेच्या दृष्टीस आल्यानंतर वादाला तोंड फुटले आहे.