अरविंद केजरीवाल म्हणजे ‘जाहिरात बाबा’; भाजपचा टोला
06-Jan-2025
Total Views |
नवी दिल्ली : (Arvind Kejriwal) दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल हे शीशमहाल बांधणारे ‘जाहिरात बाबा’ आहेत, असा घणाघात भाजपने सोमवार, दि. ६ जानेवारी केला आहे.
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषदेत आपवर निशाणा साधत केजरीवाल यांच्या घराचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान बांधण्यासाठी दिल्ली सरकारने पाण्यासारखा पैसा कसा खर्च केला आणि नियमांकडे दुर्लक्ष करून मुख्यमंत्र्यांसाठी आलिशान घर कसे बांधले, हे सांगितले. ते म्हणाले, या घराच्या तिन्ही मजल्यांवर प्रत्येकी एक स्वयंपाकघर बनवण्यात आले होते. त्यामुळे खर्चात लाखो रुपयांची वाढ झाली. कॅगच्या अहवालाचा हवाला देत त्यांनी घराची अंदाजित किंमत कशी वेगळी होती हे स्पष्ट केले, पण जेव्हा घर पूर्ण झाले तेव्हा त्याची वास्तविक किंमत कितीतरी जास्त होती. यामध्ये योग्य आणि अयोग्य अशा दोन्ही प्रकारे पैसा खर्च झाला असे पात्रा म्हणाले.
लाखो रुपये खर्च करून या घरात मिनी बार बांधण्यात आल्याचे पात्रा यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, यासोबतच घरामध्ये रेशमी गालिचाही टाकण्यात आला. घरात स्टाफ ब्लॉक आणि कॅम्प ऑफिस बांधण्यासाठीही कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. काम पूर्ण होण्यापूर्वीच ठेकेदाराला संपूर्ण रक्कम अदा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. केजरीवाल यांनी आठ नोकर क्वार्टरसाठी पैसेही काढले होते, पण ते त्यांच्या घरात खर्च केले. त्यांच्या घरात आठ बेडरूम, तीन बैठकीच्या खोल्या आणि १२ शौचालये होती. त्याचप्रमाणे उंची वस्तूंची घर भरलेले होते, असाही टोला पात्रा यांनी लगावला आहे.
जाहिरातींवरच पैसा खर्च
संबित पात्रा म्हणाले की, दिल्ली सरकारने वास्तविक योजनेत कमी पैसे खर्च केले, परंतु त्याच योजनांच्या जाहिरातींमध्ये पैसे खर्च केले. या जाहिरातींबद्दल बोलताना संबित पात्रा यांनी अरविंद केजरीवाल यांना ‘जाहिरात बाबा’ असे संबोधले.
· तरुणांना व्यवसायाशी जोडण्यासाठी ५४ कोटी रुपये खर्च करण्यात आले. कार्यक्रमाचे नाव होते बिझनेस ब्लास्टर्स. त्याच्या जाहिरातीवर पाचपट जास्त पैसा खर्च झाला.
· ५४ कोटी रुपयांच्या कार्यक्रमाच्या जाहिरातीसाठी ८० कोटी रुपये खर्च करण्यात आले. त्याचवेळी मेंटॉर ऑफ कंट्री या कार्यक्रमावर १ कोटी रुपये खर्च करण्यात आले, मात्र त्याच्या जाहिरातीत २८ कोटी रुपये वाया गेले.
· दिल्ली सरकारने ७७ लाख रुपये पराली व्यवस्थापनासाठी खर्च केले. त्याच्या जाहिरातीवर २४ कोटी रुपये खर्च करण्यात आले.