प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांना कोंबडीचे मांस खाऊ घालण्यास मज्जाव; बर्ड फ्लूमुळे....

    06-Jan-2025
Total Views |
bird flu tiger death


मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
नागपूरमध्ये गोरेवाडा वन्यजीव बचाव केंद्रात तीन वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू झाल्यानंतर केंद्रीय यंत्रणा सर्तक झाली आहे (bird flu tiger death). प्राणिसंग्रहालय आणि वन्यजीव बचाव केंद्रातील मांसभक्षी प्राण्यांना कोंबडीचे मांस खाऊ न घालण्याचे निर्देश केंद्र सरकाराने परिपत्रकामधून दिले आहेत (bird flu tiger death). तसेच या प्रकरणात चंद्रपूरमधून गोरेवाड्यात आणलेल्या वाघांचा मृत्यू झाला असला तरी, या वाघांना बर्ड फ्लूची लागण ही गोरेवाड्यामध्येच झाल्याची दाट शक्यता आहे. (bird flu tiger death)
 
 
चंद्रपूरमधून जानेवारी आणि ऑक्टोबर २०२४ रोजी पकडलेले मादी आणि नर वाघ हे चंद्रपूरमधील वन्यजीव बचाव केंद्रात ठेवण्यात आले होते. तसेच मार्च, २०२३ रोजी गडचिरोलीमधून पकडण्यात आलेली वाघिणी देखील याचठिकाणी होती. साधारण दीड वर्ष याठिकाणी राहिल्यानंतर डिसेंबर, २०२४ रोजी या तीन वाघांची रवानगी नागपूरच्या गोरेवाडा प्राणिसंग्रहालयामध्ये करण्यात आली. बुलढाण्यामध्ये मे, २०२४ रोजी पकडलेल्या मादी बिबट्याला देखील त्याच महिन्यात गोरेवाड्यामध्ये हलवण्यात आले. हे सर्व प्राणी डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत निरोगी होते. १७ डिसेंबर रोजी ते आजारी पडले. तीन वाघांवर उपचार सुरू असतानाच २४ तासांमध्ये त्यांची प्रकृती गंभीर झाली आणि त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर शवविच्छेदन करून त्यांचे नमुने भोपाळला 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय सेक्युरिटी अॅनिमल डिसिज' प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. भोपाळवरून या प्राण्यांना H5N1 बर्ड फ्लू किंवा एव्हियन फ्लूची लागण झाल्याचे समोर आले. त्यामुळे या प्राण्यांंना गोरेवाड्यामध्येच बर्ड फ्लूची लागण झाल्याची दाट शक्यता आहे. कारण, चंद्रपूरमध्ये असताना आणि त्यांना गोरेवाड्यात पाठवते वेळी हे तीन वाघ निरोगी होते.
 
 
या घटनेचा प्रतिसाद म्हणून केंद्र सरकाराने सर्व प्राणिसंग्रहालय आणि वन्यजीव बचाव केंद्रांना सर्तक राहण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले असून स्वच्छता आणि अन्न याबाबत काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मांसभक्षी प्राण्यांना कोंबडीचे मांस खाऊ न घालण्याचे निर्देश यामध्ये प्रामुख्याने देण्यात आले आहेत. मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बचाव केंद्र आणि भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाने या नियमांचे पालन करण्यास सुरुवात केली आहे.