कोकणातील देवडे (ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) येथील वैशिष्ट्यपूर्ण देवराईमध्ये चांदफळ, चांदवड, पाडळ आदी अनेक दुर्मीळ झाडे आढळली आहेत (devade sacred grove). तेथील गावकरी देवराई संवर्धनासाठी प्रयत्नशील आहेत (devade sacred grove). याविषयी आढावा मांडणारा हा लेख...(devade sacred grove)
सह्याद्री पर्वतरांगांमधील विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या देवडे (ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) येथील देवराईत चांदफळ या दुर्मीळ प्रजातीची झाडे आहेत. तेथील अभ्यासावरून असे लक्षात आले की, येथील देवराईत भरपूर पानझडी वनांमध्ये अंदाजे ४० एकरांची सदाहरित वने ही पानझडी वनांपेक्षा घनदाट आहेत. पानझडी वनांमध्ये असलेला हा सदाहरित वनांचा पट्टा मनाला भुरळ घालणारा आहे. उताराच्या जमिनीवर येणार्या झाडांचा प्रकार तो उतार कोणत्या दिशेला तोंड करून आहे, यावर ठरते. वैज्ञानिक भाषेत याला ‘आस्पेक्ट’ (Aspect) असे म्हटले जाते. देवडेच्या देवराईच्या उत्तरेकडील ‘आस्पेक्ट’ला सदाहरित वन आहे आणि बाकी इतर ठिकाणी पानझडी वने आहेत. आजपर्यंतच्या अभ्यासावरून असे सिद्ध झाले आहे की, दक्षिणेकडील ‘आस्पेक्ट’ला साधारण १.६ ते २.३ पट जास्त प्रकाश तीव्रता मिळते. त्यामुळे बाष्पीभवन जास्त होते. त्यामुळे दक्षिणेकडील ‘आस्पेक्ट’ उत्तरेकडील आस्पेक्टपेक्षा कोरडा असतो. याच कारणामुळे हा सदाहरित वनांचा भाग पानझडी वनांमध्ये तयार झाला आहे. या देवराईमध्ये चांदफळाची तब्बल १६ मोठी झाडे तसेच रानविब्बा, भेरलीमाड, वेत, सुरंगी, रानमिरी, चांदवड, पाडळ इत्यादी झाडे आढळून आली आहेत. Hopea dichotoma हे दक्षिण भारतातील झाड आणि येरिडी (Dysoxylumn binectariferum) ही दुर्मीळ झाडे कोकणात प्रथमच या देवराईत आढळल्याचे लक्षात आले आहे. त्याशिवाय वांद्री (Sterculia guttata), पाडळ/ पाटोळा (Stereospermum colais), उबळी (Gnetum ula) इत्यादी दुर्मीळ प्रजाती तसेच जमिनीखालील पाण्याचा नैसर्गिक साठा दाखविणाऱ्या काही प्रजातीही तेथे आढळल्या आहेत. त्यावर संशोधन सुरू झाले आहे.
चांदफळ
शास्त्रीय नाव : Antiaris toxicaria
स्थानिक नावे : चांदफोक, खरवत,जासुंद
कुळ : मोरॅसी (वड, उंबर, फणस आदींचे कुळ)
आढळ : आफ्रिकन गवताळ व सवाना प्रदेश, ऑस्ट्रेलिया, कॅमेरून, चीन, भारत, इंडोनेशिया, केनिया, नायजेरिया, सुदान
वैशिष्ट्ये
- २५ ते ४० मीटर उंचीपर्यंत वाढ.
- खोडातून, देठातून पांढरा विषारी चीक स्रवतो.
- चिकाचा उपयोग प्राचीन काळी धनुष्य विष म्हणून केला जात असे.
- अत्यंत कडू असणार्या बियांचे आयुर्वेदामध्ये औषधी उपयोग सांगितले आहेत. पोटदुखीचे त्रास, हगवण, अतिसार, हर्निया तसेच मधुमेह या रोगांवर उपयुक्त असल्याचे तज्ञ म्हणतात.
चांदफळ दुर्मीळ होण्याची कारणे
- औषधासाठी बिया गोळा केल्यामुळे नैसर्गिकरितीने रुजवण होत नाही.
- बिया फेब्रुवारी-मार्चमध्ये पक्व होऊन ठराविक दिवसच रुजण्यास सक्षम राहतात. त्यामुळे पावसाचा कालावधी व रुजण्यास सक्षम अशा बिया यांचा योग जुळून आला तरच नैसर्गिकरित्या बियांपासून रोपे तयार होतात, नाहीतर बिया सुकून जातात.
- या प्रजातीच्या वाढीसाठी ‘सूर्यप्रकाश लागतो. त्यामुळे घनदाट जंगलामध्ये रुजलेली रोपे वाढत नाहीत.
- नैसर्गिकरित्या रुजलेली रोपे कालांतराने पाण्याअभावी मरतात.
- बीवरील आवरण गोड असल्याने ते पक्षी आणि बिया या मुंग्या किंवा खार खातात.
संवर्धनासाठी काय करणे अपेक्षित?
- देवराईतून चांदफळाच्या बिया गोळा करून त्या रुजवून त्यांच्या विविध बीजप्रक्रियांचा अभ्यास केला जाणे गरजेचे आहे. त्यापासून रोपे रुजवून त्यांची लागवड देवडे येथील देवराईत किंवा इतरत्र ठिकाणी होणे आवश्यक आहे. त्याचसोबत गावातील तरुणाईच्या साहाय्याने येथील निसर्गसंवर्धन करावे. चांदफळाच्या बियांमधील औषधी घटकांबाबतचे संशोधन होणे गरजेचे आहे.
गावकर्यांची महत्त्वपूर्ण भूमिका
देवडेचे ग्रामस्थ अत्यंत चांगल्या प्रकारे देवराईचे संवर्धन करत आहेत. होळीच्या दिवशी भेरलीमाडाचे एक झाड वगळता वर्षभर एकही झाड गावकरी तोडत नाहीत. गावकर्यांच्या या भूमिकेमुळे येथील दुर्मीळ वृक्षांच्या ठेव्याचे जतन झाले आहे. असा आदर्श प्रत्येक गावाने ठेवून किमान देवराई संवर्धन, संगोपन करण्याची गरज आहे.
लेखक वनस्पती अभ्यासक आहेत