'आपलं सरकार' वेब पोर्टल आता नव्या स्वरूपात

"ॲप" तयार करणार; माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार

    06-Jan-2025
Total Views |

aaple sarkar
 
मुंबई : (Aaple Sarkar) महाराष्ट्र शासनाच्या ४८५ सेवा ऑनलाईन उपलब्ध करुन देणारे 'आपलं सरकार' (१.०) वेब पोर्टल अधिक सक्षम, अद्ययावत करुन नव्या स्वरूपात तयार करा. त्याच बरोबर नागरिकांना जलद माहिती उपलब्ध होण्यासाठी आपलं सरकारचे 'ॲप' तयार करुन या सुविधा मोबाईलवर उपलब्ध होतील, या दृष्टीने नियोजन करा, असे निर्देश माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी सोमवार, दि. ६ जानेवारी रोजी विभागाला दिले.
 
मंत्रलायातील दालनात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या वेळी माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नैनुटीया, राष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान संस्थेच्या संचालक सपना कपूर, महा आयटीचे प्रकल्प अधिकारी राहुल सुर्वे, महा आयटीचे प्रकल्प अधिकारी किरण पाटील, कक्षा अधिकारी सोमकुंवर उपस्थित होते.
 
महाराष्ट्र शासनाच्या ४७५ सेवा नागरिकांना आपलं सरकार वेबसाईटच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात येत असून अन्य राज्याच्या तुलनेत महाराष्ट्र यानुसार ८ व्या क्रमांकावर आहे. जन्मू काश्मीर, तमिळनाडू आणि कर्नाटक ही राज्ये ऑनलाईन सेवा देण्यात आघाडीवर आहेत. त्याचा अभ्यास करुन महाराष्ट्र शासनाने ४८५ व्यतिरिक्त २८५ नविन सेवा ऑनलाईन देण्याची तयारी केली असून लवकरच या सुविधा उपलब्ध होतील. यावर महाराष्ट्र शासनाचे विविध विभाग आणि शासनाची महा आयटी कंपनी काम करीत आहे. या सेवा कार्यान्वित झाल्यानंतर ७७० सेवा ऑनलाईन देणारे देशातील ऑनलाईन सेवा देणाऱ्या पहिल्या पाच राज्यांमध्ये आपले राज्य येईल. या दृष्टीने विभागाने तयारी सुरु केली आहे, अशी माहिती देण्यात आली.
 
त्यावर मंत्री आशिष शेलार म्हणाले की, आपलं सरकार ही वेबसाईट अपग्रेड करुन नव तंत्रज्ञानाचा वापर करुन वेबसाईट नव्या स्वरूपात तयार करण्याची गरज आहे. नागरिकांना जलद सुविधा उपलब्ध होतील, तसेच कोणत्याही सेवा सुविधेसाठी अर्ज करताना वेबसाईटवर वापरण्याची पध्दत सुलभ असायला हवी, तसेच अधिक क्षमतेचा रॅम वापरून चॅट बॉट सारख्या सुविधांसह ए आय चा वापर करुन त्या वेबसाईटवर वर असाव्यात. तसेच आपलं सरकारचे एक मोबाईल ॲप तयार करुन तांत्रिकदृष्ट्या विचार करुन सुविधा ॲपवरुन उपलब्ध करुन देण्यात याव्यात. केंद्र सरकारने डेटा सुरक्षेसाठी तयार केलेल्या कायद्यानुसार राज्याचा "स्टेट ओन क्लाउड" तयार करा, असे निर्देशही त्यांनी दिले.