गिधाड संवर्धन आणि पशुवैद्यकीय औषधे यांचा एकमेकांशी नेमका काय संबंध आहे?
- पशुवैद्यकीय उपचारांमध्ये वापरण्यात येणार्या काही वेदनाशामक औषधांमुळेच आज आपल्यावर गिधाडांचे संवर्धन करण्याची वेळ आली आहे. १९८० आणि त्यापूर्वी डॉ. विभू प्रकाश आणि रिषाद नवरोजी यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार, भारतात अंदाजे ४० लाख गिधाडे होती. ती संख्या आता काही हजारांवर येऊन पोहोचली आहे. भारत हा कृषिप्रधान देश आहे. त्यामुळे देशात पशुधनदेखील मोठ्या संख्येने आहे. पशुधनामुळे पशुसंवर्धन आणि पशु उपचाराचे प्रमाणदेखील अधिक आहे. पशु उपचारपद्धतींमध्येदेखील वेगवेगळ्या आजारांवर उपचार करण्यासाठी निरनिराळी औषधे वापरण्यात येतात. पशुचा मृत्यू झाल्यास त्याचे कलेवर पूर्वी उघड्यावर टाकले जायचे. भारतीय उपखंडामध्ये उघड्यावर टाकले जाणारे मृत गुराचे कलेवर म्हणजे गिधाडांसाठी खाद्य. या कलेवरावर उतरणारी गिधाडे ते फस्त करून टाकत. साधारण ७० गिधाडे ही ४०० ते ५०० किलोच्या गुराचे कलेवर १५ ते २० मिनिटांमध्ये फस्त करतात, असे एक गणित आहे. एक गिधाड स्वतःच्या वजनाच्या एक तृतीयांश मांस खातो. म्हणजेच साडे चार किलोचे गिधाड हे दीड किलो मांस खाते. १९९४ साली ‘डायक्लोफेनॅक’ या औषधावरील पेटंट उठले आणि त्यामुळे त्याचे उत्पादन वाढले. त्याचा दरदेखील कमी झाला. वेदनाशामक औषध म्हणून हे औषध गुरांवर प्रभावी ठरत असल्यामुळे पशुवैद्यकीय उपचारांमध्ये त्याचा वापर वाढला. सुरुवातीला त्याचा वापर गुरांमधील अस्थी भंगासारख्या दुखण्यावर होत असे. मात्र, इतर काही दुखण्यांवरही ‘डायक्लोफेनॅक’ प्रभावी होत असल्याचे लक्षात आल्यावर त्याचा सरसकट वापर वाढला. हा सर्व प्रकार मुद्दाम झाल्याचे म्हणता येणार नाही. ‘डायक्लोफेनॅक’चा वापर वाढल्यामुळे हे औषध गुरांच्या कलेवरातून गिधाडांच्या पोटात गेले आणि त्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले.
पशुवैद्यकीय वेदनाशामक औषधांमुळे गिधाडांवर काय परिणाम होतो?
- अमेरिकन शास्त्रज्ञ लिंडसे ओक्स हे ‘पेरेग्रीन फंड’च्या माध्यमातून गिधाड संवर्धनाचे काम करत होते. २००४ साली पाकिस्तानमध्ये काम करत असताना त्यांनी पशुवैद्यकीय उपचारात वापरण्यात येणारी वेदनाशामक औषधे गिधाडांवर कशा पद्धतीने प्रभाव पाडतात, याची चाचपणी करण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी ‘डायक्लोफेनॅक’ हे औषध पिंजराबंद अधिवासातील काही गिधाडांना दिले. त्यामध्ये गिधाडांचा मृत्यू झाला. नैसर्गिक अधिवासात मृत्यूमुखी पडलेल्या गिधाडांची तपासणी केल्यानंतरही ‘डायक्लोफेनॅक’ हे औषध गिधाडांच्या जीवावर उठल्याचे सिद्ध झाले. ‘डायक्लोफेनॅक’चे ०.८ मिलीग्रॅम प्रतिकिलोग्रॅम एवढे प्रमाण गिधाडाच्या शरीरात गेले, तर ते गिधाड मृत्यूशय्येवरच जाते. बर्यापैकी निरोगी असणार्या गुराच्या शरीरामध्ये
साधारण १०० मिलीग्रॅम ‘डायक्लोफेनॅक’ हे साडे चार तास राहते. त्यानंतर ते कमी कमी होत जाते. मात्र, मृत्यूशय्येवरील गुरांमध्ये हे प्रमाण कमी होण्याचा अवधी जास्त असतो. अशा परिस्थितीत गुराचा मृत्यू झाला आणि त्याचे कलेवर गिधाडाने खाल्ले, तर उर्वरित ‘डायक्लोफेनॅक’ हे गिधाडाच्या शरीरात जाते. आता ‘डायक्लोफेनॅक’ गिधाडाच्या शरीरात गेल्यावर त्याचेही ‘मेटाबॉलिज्म’ होण्यास सुरुवात होते. मूत्रपिडांमधील ‘नेफ्रॉन’च्या पूर्व भागात ते गेल्यावर त्याची दाहकता वाढते. परिणामी, गिधाडाच्या शरीरात तयार होणारे ‘युरिक अॅसिड’ हे मूत्रपिडांमधून फिल्टर होत नाही आणि ते रक्तामधून वाहाण्यास सुरुवात होते. ‘युरिक अॅसिड’चा प्रभाव वाढल्यावर ते रक्तवाहिन्यांमधून बाहेर पडते आणि गिधाडाचे यकृत, मूत्रपिंड, हृद्य या अवयवांवर पसरते. परिणामी, त्याचा मृत्यू होतो.
‘डायक्लोफेनॅक’वर बंदी असूनही त्यांच्या वापराची सद्यपरिस्थिती काय आहे?
- भारतामध्ये २००६ साली ‘डायक्लोफेनॅक’ या औषधावर बंदी आली. म्हणजे केवळ पशुवैद्यकीय उपचारांमध्ये त्याचा वापर करण्यावर बंदी लावण्यात आली. मात्र, २०११-१२ मध्ये मृत गुरांच्या केलेल्या सर्वेक्षणामधून एक गंभीर बाब समोर आली. या सर्वेक्षणामधून ११ टक्के गुरांच्या कलेवरात ‘डायक्लोफेनॅक’ सापडले. त्यामुळे त्याचा वापर सुरू असल्याचे लक्षात आले. हा वापर मानवी उपचारासाठी उपलब्ध असलेल्या ‘डायक्लोफेनॅक’च्या माध्यमातून सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी ‘डायक्लोफेनॅक’च्या ३० किलोच्या मल्टिडोस कुपी उपलब्ध होत्या. त्या मानवी उपचारासाठी वापरल्या जात होत्या. यावर बंदी आणण्यासाठी ‘डायक्लोफेनॅक’च्या बंदीनंतर साधारण नऊ वर्षांनंतर तामिळनाडूमधील ‘अरुलगम’ या संस्थेच्या भारतीदासन यांनी मद्रास उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली. यावर निर्णय देताना उच्च न्यायालयाने ३० किलोच्या मल्टिडोस कुपीच्या वापरावर बंदी आणली. मात्र, असे असूनही गेल्यावर्षी आम्हाला एका पशुवैद्यकाने मानवी ‘डायक्लोफेनॅक’चे तीन किलोचे पाच डोस गुरांना द्यावे, असे लिहलेले प्रिस्क्रिप्शन आढळले आहे. त्यामुळे ‘डायक्लोफेनॅक’चा अजूनही वापर सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे.
पशुवैद्यकीय उपचारातील अजून कोणत्या औषधांवर बंदी येणे आवश्यक आहे?
- भारत सरकारने आजवर पशुवैद्यकीय उपचारात वापरण्यात येणार्या चार वेदनाशामक औषधांवर बंदी आणली आहे. ‘निमसुलाईड’ या औषधावर दि. ३० डिसेंबर २०२४ रोजी बंदी आणण्यात आली असून ‘डायक्लोफेनॅक’च्या वापरावर २००६ साली, ‘एसिक्लोफेनाक’ आणि ‘केटोप्रोफेन’च्या वापरावर २०२३ साली बंदी लावण्यात आली आहे. याशिवाय, पशुवैद्यकीय उपचारात वापरण्यात येणारे ‘कारप्रोफेन’ या औषधाचे उच्च डोस हे गिधाडांसाठी हानिकारक असल्याचे सिद्ध झाले आहे. तसेच, ‘फ्लुनिक्सि’ नावाचे औषधदेखील गिधाडांसाठी विषकारक असल्याचे निदर्शनास आले आहे. तर ‘मेलॉक्सिकॅम’ आणि ‘टॉल्फेनामिक अॅसिड’ ही दोन वेदनाशामक औषध गिधाडांसाठी हानिकारक नसल्याचे समोर आले आहे.
पशुवैद्यकीय वेदनाशामक औषधांवर बंदी घालताना त्यांचे नियोजन कशाप्रकारे होणे अपेक्षित आहे?
- पशुवैद्यकीय उपचारांमधील एखाद्या नव्या औषधाच्या उत्पादनानंतर ते वापरात येण्यापूर्वी आणि त्याला मान्यता देण्यापूर्वी त्याचा गिधाडांच्या आरोग्यावर काही परिणाम होत आहे का, या अनुषंगाने चाचणी करणे आवश्यक आहे. ‘कन्व्हेशन ऑफ मायग्रेटरी स्पिसीज’ या परिषदेमध्येदेखील हा प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र, त्यावर कोणत्याही प्रकारचे काम झालेले नाही. त्यामुळे औषधाच्या वापराला मान्यता देण्यापूर्वी त्याची गिधाडाच्या अनुषंगाने तपासणी करणे आवश्यक आहे. तसेच, बंदी घातल्यानंतरही वितरित केलेली औषधे संपण्यासाठी बराच कालावधी जातो. तोपर्यंत त्यांचा वापर सुरू राहतो. त्यामुळे बंदीनंतर त्या औषधाच्या वापरावर रोख लावण्याची विहित वेळदेखील निश्चित करणे आवश्यक आहे.
जनजागृतीसाठी आपल्याला काय करणे अपेक्षित आहे?
- सर्वप्रथम गिधाडांविषयी सर्वसामान्य लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याची गरज आहे. सोबतच गिधाडांसाठी हानिकारक असलेली वेदनाशामक औषधे न सूचवण्यासाठी पशुवैद्यक सङ्कूहामध्ये जागृती करण्याची गरज आहे. आजही पशुवैद्यकीय समूहामध्ये वेदनाशामक औषधांवर घातलेल्या बंदीविषयी अनेक गैरसमज आहेत. बंदीचे निर्णय काही पशुवैद्यकांना अजूनही पटलेले नाहीत. दुसर्या औषधांना प्राधान्य देण्यासाठी आणि त्यांची विक्री वाढवण्यासाठी ही बंदी घातल्याचा समज, काही पशुवैद्यकांमध्ये आहे. त्यामुळे हा समज दूर करण्याची नितांत गरज आहे. यापुढे जाऊन पशुवैद्यकीय शास्त्राचे शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांमध्ये वेदनाशामक औषधांविषयी जागृती निर्माण करण्याची गरज आहे