दृष्टीदोष दूर करण्यासाठी प्रत्येकाचे योगदान आवश्यक : डॉ. कृष्णगोपालजी

06 Jan 2025 16:57:53

Dr Krishnagopal RSS

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Netra Kumbh inauguration Prayagraj) 
"भारतापेक्षा अनेक पटीने लहान असलेल्या श्रीलंकेमध्ये नेत्रदानाची म्हणजेच कॉर्निया दानाची टक्केवारी खूप जास्त आहे, तर भारतात त्याचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यात वाढ करण्याची गरज आहे. सर्व देशवासियांनी कॉर्निया दान करण्याचा संकल्प करून देशातील दृष्टीदोष दूर करण्यासाठी योगदान द्यायला हवे.", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह डॉ. कृष्णगोपालजी यांनी केले.

हे वाचलंत का? : समाजाची व पर्यावरणाची सेवा हीच भारत मातेची खरी पूजा : सरसंघचालक

उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे महाकुंभाला सुरुवात होत असून याठिकाणी 'सक्षम', 'द हंस फाऊंडेशन', 'स्वामी विवेकानंद हेल्थ मिशन', 'श्री भाऊराव देवरस न्यास', 'श्री रज्जू भैय्या सेवा न्यास, 'नॅशनल मेडिकोज ऑर्गनायझेशन' आणि 'सेवा भारती' आदी विविध संस्थांच्या सहकार्याने नेत्रकुंभ मोठ्या स्तरावर संपन्न होत आहे. रविवारी डॉ. कृष्णगोपालजी यांच्या शुभहस्ते नेत्रकुंभाचे उद्घाटन झाले. वैदिक विद्वानांच्या स्वस्तिवाचन आणि भक्त कवी सूरदास व भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून नेत्रकुंभाची सुरुवात झाली.


Dr Krishnagopal RSS

डॉ. कृष्णगोपालजी पुढे म्हणाले, 'गेल्या वेळी १ लाख ५६ हजार लोकांना चष्म्यांचे वाटप करण्यात आले होते. यादरम्यान नेत्रकुंभाला विश्वविक्रमाचे प्रमाणपत्रही मिळाले आहे. हरिद्वार कुंभमध्येही १२ ठिकाणी नेत्र कुंभाचे आयोजन करण्यात आले होते. हरिद्वारमध्ये ४०० डॉक्टरांनी योगदान दिले होते.' यावेळी प्रयागराजमध्ये नवा विक्रम होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. अडीचशे संस्था मिळून नेत्रदान आणि ऑपरेशनसाठी सहकार्य करणार आहेत. केरळपासून काश्मीरपर्यंत सर्वजण मिळून काम करतील आणि जगासमोर एक नवा आदर्श मांडतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

जनजागृतीची नितांत गरज
देशात नेत्रदानाबाबत जनजागृतीची नितांत गरज आहे. हा नेत्र कुंभ ही उणीव पूर्ण करेल. नेत्र कुंभच्या माध्यमातून ६० हजार लोकांना ऑपरेट करण्याचे लक्ष्य आहे. माणूस कोणत्याही शहराचा रहिवासी असला तरी त्याचे ऑपरेशन तेथेच होणार आहे. त्यांना फक्त माहिती द्यावी लागेल.

नेत्रदान हे सर्वात मोठे दान
डोळ्यांशिवाय निसर्ग आणि देव दोन्ही दिसत नाहीत. म्हणूनच नेत्रदान हे सर्वात मोठे दान मानले जाते. अर्पण, त्याग आणि समर्पण हा सनातन संस्कृतीचा संदेश आहे.
- जुना आखाड्याचे महामंडलेश्वर अवधेशानंद गिरी जी महाराज

Powered By Sangraha 9.0