महाकुंभादरम्यान भाविकांना काशी विश्वनाथाचे केवळ मुखदर्शन!

गाभाऱ्यातील दर्शनाला तात्पुरती बंदी

    06-Jan-2025
Total Views |

Kashi Vishwanath

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Mahakumbh 2025 : Kashi Vishwanath News)
प्रयागराज येथे महाकुंभासाठी येणाऱ्या भाविकांची मोठी संख्या लक्षात घेता काशी विश्वनाथ मंदिर प्रशासनाने दि. २६ फेब्रुवारीपर्यंत गाभाऱ्यातील दर्शनावर तात्पुरती बंदी घातली आहे. प्रयागराज महाकुंभातून दहा कोटी भाविक काशीत येण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यातीलचा प्रोटोकॉल लागू असेल.

व्यवस्था सुरळीत चालवण्यासाठी मंदिर प्रशासनासोबत बैठक घेऊन सरकारने याबाबत रणनीती आखली आहे. काशी विश्वनाथ मंदिरातील भाविकांची संख्या लक्षात घेऊन नवीन वर्षापासूनच गाभाऱ्यातील दर्शनावर बंदी घालण्यात आली होती. भाविकांची सुरक्षा आणि सुविधा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे मंदिर प्रशासनाचे म्हणणे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दि. १ ते ४ जानेवारी दरम्यान १८ लाखांहून अधिक भाविकांनी बाबा विश्वनाथांचे दर्शन घेतले होते. २०२४ मध्ये दैनंदिन सरासरी भाविकांची संख्या १.७० लाख होती, ती जानेवारी २०२५ मध्ये दोन लाखांहून अधिक झाली आहे.

श्री काशी विश्वनाथ मंदिराचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वभूषण मिश्रा यांनी सांगितले की, दि. १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी दरम्यान प्रयागराजमध्ये दिव्य आणि भव्य महाकुंभ आयोजित करण्यात येत आहे. तेथून मोठ्या संख्येने भाविक काशीत येऊन बाबा विश्वनाथांचे दर्शन घेतील. त्यामुळे गाभाऱ्यातील दर्शनावर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे.