कोणत्याच निरपराध व्यक्तीला शिक्षा होता कामा नये, असंसुद्धा कायदा सांगतो!
मंत्री धनंजय मुंडेच्या राजीनाम्याच्या मागणीवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया
06-Jan-2025
Total Views |
मुंबई : काहीही सिद्ध झालेले नसताना एकदम राजीनामा घेणे योग्य नाही. कोणत्याच निर्दोष व्यक्तीला शिक्षा होता कामा नये, असंसुद्धा कायदा सांगतो, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी दिली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर त्यांनी सोमवार, ६ जानेवारी रोजी पत्रकार परिषदेत ही प्रतिक्रिया दिली.
छगन भुजबळ म्हणाले की, "मला मंत्री व्हायचे आहे म्हणून कुणाचातरी बळी घ्यावा किंवा राजीनामा घ्यावा, असे माझ्या मनात स्वप्नातही येणे शक्य नाही. बीड प्रकरणाची पूर्ण चौकशी करणार आणि त्यात लहान मोठे जे कुणी दोषी सापडतील त्या सर्वांवर कारवाई करू, असे मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितले आहे. पण त्या अगोदरच धनंजय मुंडेंचा राजीनामा का मागतो आहोत? चौकशीत तसे काही बाहेर आले का? जोपर्यंत या प्रकरणात धनंजय मुंडेंचा हात आहे हे सिद्ध होत नाही तोपर्यंत त्यांनी राजीनामा का द्यावा? साप साप म्हणून भुई थोपटणे योग्य नाही," असे ते म्हणाले.
"मीसुद्धा अशा एका प्रकरणातून गेलेलो आहे. त्यामुळे काहीही सिद्ध झालेले नसताना एकदम राजीनामा घेणे योग्य नाही. सगळे नेते किंवा मंत्री हे लहानपणापासून काम करत करत पुढे जातात. मंत्रीपद काही ताबडतोब मिळत नाही. त्यामुळे त्यांना अशा प्रकारे ताबडतोब राजीनामा मागणे मला योग्य वाटत नाही. अशा निर्घृण हत्येची कल्पनाच आपण करू शकत नाही. त्यामुळे दोषींना फाशीच झाली पाहिजे. पण कुणावर अन्याय होता कामा नये, असे मला वाटते," असेही भुजबळ म्हणाले.
ही लोकशाही आहे, ठोकशाही नाही!
मनोज जरांगेंनी धनंजय मुंडेंबाबत केलेल्या विधानावर बोलताना भुजबळ म्हणाले की, "ज्या पद्धतीने जरांगे बोलतात ते बरोबर नाही. ही लोकशाही आहे, ठोकशाही नाही. त्यामुळे मुंडे दोषी असतील तर त्यांच्यावर आपोआपच कारवाई होईल. तुम्ही कायदा हातात घेण्याची आवश्यकता नाही."
"सगळ्यांनी हे प्रकरण थोडे शांतपणे घेतले पाहिजे. अतिशय वाईट पद्धतीने हा खून झाला. दोषीला फाशीची शिक्षा व्हावी, हे सगळे बरोबर आहे. पण एकाही निर्दोष व्यक्तीला शिक्षा होता कामा नये, असेदेखील कायदा सांगतो," असे ते म्हणाले.