‘मातोश्री टू‘ बांधणाऱ्या उद्धव ठाकरेंना पंतप्रधान मोदींचा साधेपणा दिसणार नाही!

सामनातील अग्रलेखावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

    06-Jan-2025
Total Views |
 
Uddhav Thackeray
 
मुंबई : मातोश्री टू बांधणाऱ्या उद्धव ठाकरेंना पंतप्रधान मोदींचा साधेपणा दिसणार नाही, असा पलटवार भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. सोमवार, ६ जानेवारी रोजी 'सामना' वृत्तपत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्यात आली. यावर बावनकुळेंनी 'X' अकाऊंटवर पोस्ट करून प्रत्युत्तर दिले.
 
 
 
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "अडीच वर्षे घरात बसून ‘अतिविलास‘ करणारे उद्धव ठाकरे सामनामधून पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर टीका करतात. हा मोठा विनोदच म्हणावा लागेल. विलासी असा आरोप करणाऱ्यांनी पंतप्रधान मोदीजींचा जीवनप्रवास बघावा. एक चहावाला पंतप्रधान होतो, तेव्हा तो त्यांच्या साधेपणाने आणि मेहनतीनेच होतो."
 
"मोदीजींच्या सक्षम नेतृत्वाखालील देशाचा विकास होतो आहे. मोदीजींनी त्यांच्या राजकीय आणि वैयक्तिक आयुष्यात कायमच साधेपणा जपला आहे. मात्र, त्यांचा साधेपणा ‘मातोश्री टू‘ बांधणाऱ्या उद्धव ठाकरेंना दिसणार नाही. त्यामुळेच ते दिल्लीत शीशमहल बांधणाऱ्या अरविंद केजरीवालांच्या मदतीला धावून आले आहेत. पंतप्रधानांचे परदेश दौरे देशाची प्रतिमा मजबूत करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय संबंध दृढ करण्यासाठी असतात. भेटवस्तूंचा विषय उगाच गाजवून देशातील विकासावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न आहे. भारताचे जागतिक स्थान उंचावले गेल्याने त्याचा तुम्हाला खरा त्रास होत आहे," असेही ते म्हणाले.