मुंबई : श्री वारकरी प्रबोधन महासमिती, महाराष्ट्र आयोजित रौप्यमहोत्सव पालखी सोहळा दि. ५ जानेवारी २०२५ रोजी पार पडला. कॉटनग्रीन येथील राम मंदिरातून सकाळी ८ वा. ही दिंडी ( Warkari Dindi ) सुरु करण्यात आली. मुंबईतील कॉटनग्रीन, परळ गाव, भोईवाडा, नायगाव असे पायी चालत वारकरींनी प्रति पंढरपूर मानले जाणाऱ्या वडाळा येथील विठ्ठल मंदिरात आपल्या दिंडीची सांगता केली. तीन हजार पेक्षा जास्त वारकरी या दिंडीत, व पालखी सोहळ्यात सहभागी झाले.
रविवारी मुंबई विठुरायाच्या गजरात न्हाऊन निघाली. संपुर्ण मुंबईतील वारकरी सांप्रदाय, भजनी मंडळ, महिला सांप्रदाय वर्ग एकत्र आलेला पाहायला मिळाला. आषाढी कार्तिकी वारीचा अनुभव हा मुंबईतील माणसांना मिळावा म्हणून या पालखी सोहळ्याचे व दिंडीचे आयोजन करण्यात आले. कॉटनग्रीन येथे स्थित राम मंदिरातून हा पालखी सोहळा सकाळी ८ वा. सुरु झाला. सर्व वारकरी रखरखत्या उन्हात पायी चालत, विठुरायाचे नाम मुखी घेत, मृदुंगाच्या तालात, टाळांच्या गजरात, वाजत गाजत दिंडी चालली.
दिंडीमध्ये चालताना सर्वात पुढे झेंडेकरी, पताका, मग टाळकरी, वीणेकरी व त्यामागे तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला, आणि त्यामागे मोकळे चालणारे लोक असा क्रम होता. यामध्ये वारकरी मंडळींनी शुभ्र वस्त्र, धोतर, झब्बा, महिलांनी नऊवारी साड्या, पांढऱ्या रंगाच्या साड्या परिधान केल्या होत्या. अनेक छोट्या वारकऱ्यांनीदेखील हातात पताका घेतल्या होत्या. तसेच एका वारकऱ्याने भगवान विठ्ठलाची वेशभूषा साकार केली होती. ही दिंडी दुपारी ३ वाजेपर्यंत वडाळा येथील विठ्ठल मंदिरात आपल्या मायबाप विठ्ठलाच्या भेटीस दाखल झाली.
श्री वारकरी प्रबोधन महासमिती महाराष्ट्र रौप्यमहोत्सवानिमित्त ह.भ.प. रामेश्वर महाराज शास्त्री यांच्या अध्यक्षतेखाली, सचिव नाना निकम यांच्या देखरेखीखाली हा संपुर्ण सोहळा पार पडला. मुंबईतील कुर्ला, भांडुप, नवी मुंबई, नायगाव, अंधेरी, वडाळा, विलेपार्ले, परळ अशा ठिकाणांहून अनेक वारकरी मंडळी या पालखी सोहळ्यात सहभागी होती. या पालखी सोहळ्यामुळे मुंबई भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली. मुंबईकरांना दिंडीचा विशेष अनुभव मिळाला.