सक्षम भारतीय स्त्री हाच भारताचा खरा दागिना - अमृता फडणवीस

१७ व्या आयआयजेएस एक्झीबिशनचे दिमाखात उद्घाटन.

    05-Jan-2025
Total Views |

arthbharat

मुंबई : भारतीय सक्षम आणि समर्थ स्त्री हाच भारताचा खरा दागिना आहे असे प्रतिपादन प्रसिद्ध बँकिंग तज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या अमृता फडणवीस यांनी केले. जीजेईपीसी आयोजित १७ व्या आयआयजेएस एक्झीबिशनचे उद्घाटन मुंबईतील बॉम्बे एक्झीबिशन सेंटर येथे पार पडले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अमृता फडणवीस यांनी भूषवले. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र उद्योग विकास आयुक्त देवेंद्रसिंह खुशवाह, भारतीय उद्योग आणि व्यापार खात्याचे संचालक आर. अरुलानंदन, सेन्को गोल्ड अँड डायमंडचे व्यवस्थापकीय संचालक सुवंकर सेन उपस्थित होते. ७ जानेवारी पर्यंत चालणाऱ्या या एक्झीबिशनमध्ये देश - विदेशातून तब्बल ३२०० विक्रेते भाग घेतला आहे.
 
या कार्यक्रमा प्रसंगी बोलताना अमृता फडणवीस यांनी जीजेईपीएस कडून दागिने निर्मिती क्षेत्रातील काम करणाऱ्या महिलांच्या सक्षमी करण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांचे कौतुक केले. दागिने निर्मिती हे क्षेत्रच असे आहे की ज्या मध्ये भारतीय स्त्रिया याच सर्वात महत्वाचा घटक आहेत. त्यांच्या सक्षमीकरणाशिवाय या क्षेत्राला आणि पर्यायाने देशाला विकसित होत येणार नाही. त्यामुळे सरकारने तसेच या प्रमुख व्यावसायिकांच्या संघटनांनी या विषयाकडे लक्ष दिले पाहिजे असे मत अमृता फडणवीस यांनी मांडले.
 
दागिने निर्मिती क्षेत्र हे भारताच्या एकूण निर्यातक्षम क्षेत्रातील एक प्रमुख क्षेत्र आहे त्यामुळे या क्षेत्राच्या विकासाने देशाला मोठा फायदाच होणार आहे असे मत भारतीय उद्योग आणि व्यापार खात्याचे संचालक आर अरुलानंदन यांनी मांडले.
महाराष्ट्र हे देशातील दागिने निर्मिती क्षेत्राचे हृदय आहे. त्यामुळे महाराष्ट्रात या क्षेत्राला आवश्यक असणाऱ्या सर्वच पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी महाराष्ट्र सरकार कायमच तत्पर राहील असा विश्वास महाराष्ट्र उद्योग विकास आयुक्त देवेंद्रसिंह खुशवाह यांनी व्यक्त केला.

भारतातील एकूणच निर्मिती क्षेत्राला आपल्या गुणवत्तेवर आणि उद्योजकता वाढीवर लक्ष केंद्रित करावे लागेल आणि त्या गोष्टींमुळेच भारतीय निर्मिती क्षेत्र हे जागतिक बाजारपेठ काबीज करू शकेल आणि जीजेईपीसी यांच्याकडून या करिता केले जाणारे प्रयत्न प्रशंसनीय आहेत असे मत सेन्को‌ गोल्ड अँड डायमंडचे व्यवस्थापकीय संचालक सुवंकर सेन यांनी मांडले. जीजेईपीसी कडून अशा मोठ्या प्रमाणावर केल्या जाणाऱ्या प्रयत्नांमुळे भारतातील दागिने निर्मिती क्षेत्राला नवीन झळाळी प्राप्त होईल आणि भविष्यात जागतिक बाजारपेठांमध्ये भारतीय दागिने निर्मिती क्षेत्राचे नाव उजळून निघेल असे मत सर्वच मान्यवरांनी व्यक्त केले.