सिंधुदुर्गात होणार समुद्री घोड्यांचा ‘संवर्धन प्रजनन प्रकल्प’; काय आहे नेमका प्रकल्प ?

    05-Jan-2025
Total Views |
sea horse sindhudurg



मुंबई (अक्षय मांडवकर) -
समुद्री घोड्यांची संख्या वाढवून त्याच्यासाठी आवश्यक असणार्‍या अधिवासाच्या निर्मितीसाठी ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’ने (बीएनएचएस) वनविभागाच्या ‘कांदळवन प्रतिष्ठान’सोबत सामंजस्य करार केला आहे (sea horse sindhudurg). या करारांतर्गत सिंधुदुर्गमध्ये समुद्री घोड्यांसाठी संवर्धन प्रजनन केंद्राची निर्मिती करण्यात येणार आहे (sea horse sindhudurg). या केंद्रासाठी ‘बीएनएचएसएन’ने आवश्यक असलेली जागा शोधण्याची आणि त्यासाठीच्या तज्ज्ञ शास्त्रज्ञांच्या नेमणुकीची प्रक्रिया सुरू केली आहे.(sea horse sindhudurg)

‘सी हॉर्स’ म्हणजेच समुद्री घोडा हा अस्थिमत्स्य वर्गातील एक मासा आहे. भारतात समुद्री घोड्याच्या अंदाजे सात प्रजाती सापडतात. त्यापैकी ‘हिम्पोकॅम्पस कुडा’ म्हणजेच ‘यलो स्पॉटेड सीहॉर्स’ ही एकमेव प्रजात महाराष्ट्राच्या सागरी परिक्षेत्रात आढळते. ही प्रजात कांदळवन, खाड्या, समुद्री गवतांचे प्रदेश, खडकाळ किनारे अशा काही अधिवासांमध्ये आढळते. या प्रजातींचा वापर मत्स्यपालन आणि चिनी औषधांमध्ये मोठ्या प्रमाणावर होत असल्याने त्याची तस्करी होते. भारत, थायलंड, व्हिएतनाम आणि फिलीपिन्स हे समुद्री घोड्यांचे मुख्य निर्यातदार आहेत. परंतु, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या प्रजातीचा व्यापार ५० हून अधिक राष्ट्रांमधून होतो. ‘भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्यां’तर्गत प्रथम श्रेणीत समुद्री घोडे संरक्षित आहेत.

२०१८ साली मुंबईतून १०० किलो सुकवलेल्या समुद्री घोड्यांची तस्करी पकडण्यात आली होती. त्यामुळे समुद्री घोड्यांच्या संख्येला आणि अधिवासाला असलेला धोका लक्षात घेऊन ‘बीएनएचएस’ने सिंधुदुर्गामध्ये समुद्री घोड्यांसाठी संवर्धन प्रजनन प्रकल्पाचा घाट घातला आहे. हा प्रकल्प सात कोटी रुपयांचा असून, यामाध्यमातून समुद्री घोड्यांचे प्रजनन आणि त्यांच्यासाठी आवश्यक असणार्‍या अधिवासाची निर्मिती करण्यात येणार आहे. सिंधुदुर्गात आचरा आणि मिठमुंबरी या भागात समुद्री घोडे सापडत असल्याच्या नोंदी आहेत. त्यामुळे याच भागात संवर्धन प्रजनन केंद्र उभारण्याचा ‘बीएनएचएस’चा मानस आहे. या संवर्धन प्रकल्पाकरिता समुद्री घोड्यांवर काम केलेला एखादा तज्ज्ञ शास्त्रज्ञ नेमण्यासाठी ‘बीएनएचएस’ने जाहिरातदेखील प्रसिद्ध केली आहे.

संख्येबरोबरच अधिवासावर भर
समुद्री घोड्यांच्या संवर्धन प्रजनन प्रकल्पामध्ये आम्ही त्यांची संख्या वाढविण्याबरोबर त्यांच्या अधिवासाच्या निर्मितीसाठीही भर देणार आहोत. हे समुद्री घोडे प्रामुख्याने समुद्री गवताळ प्रदेशामध्ये अधिवास करतात. त्यामुळे असे गवताळ प्रदेश सिंधुदुर्गात कोणत्या ठिकाणी तयार करता येऊ शकतील याविषयी तपासणी सुरु आहे. शिवाय केंद्रासाठी जागेचादेखील आम्ही शोध घेत आहोत. - किशोर रिठे, संचालक, बीएनएचएस