उपोषणादरम्यान व्हॅनिटी व्हॅन वापरणारे प्रशांत किशोर अडचणीत!

    05-Jan-2025
Total Views |
   
prashantt

पटना : बिहारमधील लोकसेवा आयोगाचे पेपरफुटीचं प्रकरण देशभर चांगलच गाजतंय. जनसुराज्य पक्षाचे संस्थापक नेते प्रशांत किशोर यांनी संपूर्ण परीक्षा रद्द करून पुन्हा नव्याने सगळ्यांसाठी परीक्षा घ्यावी या मागणीसाठी आमरण उपोषण करण्याचा निश्चय किशोर यांनी व्यक्त केला. अशातच आता उपोषणादरम्यान कोट्यवधी रूपयांची व्हॅनिटी व्हॅन वापरल्या प्रकरणी प्रशांत किशोर गोत्यात आल्याचे दिसून येत आहे.

"मी जर घरी गेलो तर लोकांना संशय येईल की मी माझं उपोषण मोडले म्हणून. याच कारणासठी मी या व्हॅनिटी व्हॅनचा वापर करणार आहे. ही व्हॅनिटी व्हॅन मी वापरू नये अशी जर कुणाची इच्छा असेल, तर त्यांनी मला २५ लाख रूपयांचं भाडं द्यावं. माझ्या या गोष्टींची चौकशी जशी केली जाते, तशी बिहारच्या मुख्यमंत्र्यांची चौकशी केली जाईल का ?" असा सवाल त्यांनी केला आहे. प्रशांत किशोर यांनी बिहारच्या गांधी मैदानात आपले आमरण उपोषण सुरू केले. १३ डिसेंबर रोजी झालेली परीक्षा रद्द करण्यात यावी या मागणीसाठी प्रशांत किशोर उपोषणाला बसले आहेत. त्याच बरोबर पेपरफुटी प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, गेल्या १० वर्षात झालेल्या पेपरफुटी संदर्भात बिहारच्या राज्य सरकारने श्वेत पत्रिका काढावी, तसेच विद्यार्थ्यांवर लाठी चार्ज करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी प्रशांत किशोर यांनी केली आहे.
 
शनिवार दिनांक ४ जानेवारी रोजी निवडक १२००० विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा परीक्षा घेण्यात आली. परंतु सर्व विद्यार्थ्यांची परिक्षा पुन्हा एकदा घेण्यात यावी या मागणीवर प्रशांत किशोर अडून बसले आहेत. याच दरम्यान स्थानिक प्रशासनाने प्रशांत किशोर यांचे हे उपोषण अनाधिकृत असल्याचे म्हटले आहे.