नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ जानेवारी रोजी उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे नमो भारत रॅपिड रेल ट्रान्झिट सिस्टम (RRTS)च्या दिल्ली विभागाचे उद्घाटन केले. पंतप्रधान मोदींनी साहिबाबाद आरआरटीएस स्थानकाला भेट दिली आणि दिल्लीतील न्यू अशोक नगर स्थानकापर्यंत या नमो भारत ट्रेनने प्रवास केला. या प्रवासादरम्यान मोदी यांनी शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
कॉरिडॉरचे नवीन बांधकाम गाझियाबाद ते न्यू अशोक नगर दिल्ली इथपर्यंत विस्तारीत आहे. दिल्ली-गाझियाबाद-मेरठ या एका मोठ्या RRTS कॉरिडॉरचा हा एक भाग आहे. RRTS कॉरिडॉर ५४ किलोमीटरचा असून इथे ११ स्थानके आहेत. एकदा कार्यान्वित झाल्यानंतर, वर्धित कॉरिडॉरमुळे दिल्ली आणि मेरठ दरम्यानच्या प्रवासाची वेळ कमी होण्यास मदत होण्यास मदत होईल. दिल्ली आणि मेरठ दरम्यान मोठ्या संख्येने लोक कामासाठी दररोज प्रवास करतात. RRTS मुळे हा प्रवास आरामदायी आणि जलदगतीने होणार आहे. आनंद विहार स्टेशन, RRTS मार्गावरील पहिले भूमिगत स्थानक असून ते एक प्रमुख ट्रान्झिट हब बनणार आहे. सदर स्थानक हे पिंक आणि ब्लू मेट्रो लाईन, आनंद विहार रेल्वे स्टेशन आणि आंतरराज्य बस टर्मिनलला जोडणार आहे.