मेट्रोच्या कामांसाठी सुधारित वेळापत्रक करा : मुख्यमंत्री
05-Jan-2025
Total Views |
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांतील कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी आणि रस्त्यावरील वाहतुककोंडी कमी करण्यासाठी मुंबई आणि मुंबई उपनगरांत विविध ‘मेट्रो’ प्रकल्पांची ( Metro Work ) कामे प्रगतीपथावर आहेत. या ‘मेट्रो’ प्रकल्पांचा आणि मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरु असणार्या कामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. यावेळी त्यांनी ‘मेट्रो’ची कामे पूर्ण करण्यासाठी सुधारित वेळापत्रक करण्याचे निर्देश दिले.
शनिवार, दि. ४ जानेवारी रोजी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, नगरविकास विभाग (१) चे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त संजय मुखर्जी, मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अश्विनी भिडे, मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त विक्रम कुमार, अश्विन मुदगल, महामुंबई ‘मेट्रो संचलन महामंडळ’ व्यवस्थापकीय संचालक रुबल आगरवाल, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक ‘मेट्रो’ मार्गाचा आढावा घेतला. “सद्यस्थितीत मुंबई उपनगरांत सुरू असलेली सर्व ‘मेट्रों’ची कामे पूर्ण होण्याचे वेळापत्रक नव्याने तयार करा. कामांमध्ये विलंब चालणार नाही. अनेक ठिकाणी कारशेडशिवाय ‘मेट्रो’ सुरु होत आहेत. त्यामुळे ‘मेट्रो’ सुरु करण्यासाठी त्यासाठी थांबू नका. जगात असे प्रयोग होत आहेत, त्याचा अभ्यास करा. भविष्यातील सर्व संभाव्य ‘मेट्रो’ प्रकल्पांचा आढावा घेत, त्यासाठी कारशेडसाठी जागा आतापासूनच आरक्षित करा,” असे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना दिले. तसेच यंदाच्या वर्षात २२ किमी ‘मेट्रो’ सुरु करण्याचे निर्देशदेखील मुख्यमंत्र्यांनी दिले.
‘मेट्रो-३’ मुळे २०-२५ किमीची त्यात आणखी भर पडेल, म्हणजेच यंदाच्या वर्षी एकूण ५० किलोमीटरच्या मेट्रोचे जाळे मुंबईत विस्तारेल. इतकेच नाहीतर पुढच्या वर्षीपासून ५० किमी ‘मेट्रो’ दरवर्षी सुरू होईल, हे सुनिश्चित करा, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमएमआरडीला लक्ष्य दिले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंदू मिल येथील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक’ आणि ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक’ यांच्या कामांचा आढावाही घेतला. या दोन्ही प्रकल्पांच्या वार्षिक देखभालीसाठी आराखडा आताच तयार करा, अशा सूचना अधिकार्यांना देण्यात आल्या. दरम्यान, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त संजय मुखर्जी यांनी प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरु असलेल्या कामांचे सादरीकरण केले.