सुरक्षा दलाने बस्तरमध्ये केला ४ माओवाद्यांचा खात्मा!

    05-Jan-2025
Total Views |

maoist

रायपूर : केंद्र सरकारने सत्तेत आल्यावर नक्षलवादाच्या विरोधात आघाडी उघडत समाजकंटकांना जेरबंद करण्याची मोहीम हाती घेतली आहे. अशातच आता छत्तीसगडच्या बस्तर येथील नारायणपूर आणि दंतेवाडा भागातील सीमांजवळ ४ जानेवारीच्या रात्री सुरक्षा रक्षकांना ४ नक्षलवाद्यांना संपवण्यात यश आले आहे. पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत एका सुरक्षा अधिकाऱ्याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

दक्षिण अभुजमाड येथील जंगलात सुरक्षा दल कारवाई करत असताना नक्षलवाद्यांवर गोळीबार करण्यात आला. जिल्हा राखीव रक्षक दलाचे हेड कॉनस्टेबल सन्नु करम यांचा शनिवारी झालेल्या चकमकीत मृत्यू झाला आहे. रात्री गोळीबार थांबल्यानंतर सदर नक्षलवाद्यांची प्रेतं ताब्यात घेण्यात आली. AK 47 सह मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार सुरक्षा दलाची मोहीम सुरू आहे.

२०२४ मध्ये २०० माओवाद्यांचा खात्मा!
छत्तीसगडच्या सुरक्षा रक्षकांनी २०२४ या एका वर्षात तब्बल २०० जणांचा खात्मा केला. २०२६ पर्यंत माओवाद्यांची चळवळ ही पूर्णपणे संपुष्टात होईल अशी खात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केली. जवळपास ८०० माओवाद्यांना अटक करण्यात सरकारला यश आले. जवळपास १८ सुरक्षा रक्षकांना माओवाद्यांशी लढताना आपल्या प्राणांचा त्याग केला. माओवाद्यांनी घडवून आणलेल्या हिंसाचारात ६५ नागरिकांचा जीव गेला.