‘निष्ठावंत’ राजन साळवींचा सूर २४ तासांत बदलला

योग्य वेळी योग्य निर्णय घेणार; पक्षातील वरिष्ठ पराभवास कारणीभूत

    04-Jan-2025
Total Views |
Rajan Salvi

मुंबई : स्वतःला ठाकरेंचा ’निष्ठावंत’ म्हणवणार्‍या माजी आमदार राजन साळवी ( Rajan Salvi ) यांचा सूर २४ तासांत बदलला आहे. आपल्या पराभवास पक्षातील वरिष्ठ कारणीभूत असल्याचा आरोप करीत “योग्य वेळी, योग्य निर्णय घेणार,” असा इशारा त्यांनी शुक्रवार, दि. ३ जानेवारी रोजी दिला.

राजापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी हे उबाठा गटाला ‘राम राम’ करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा माध्यमांमध्ये पसरल्यानंतर गुरुवार, दि. २ जानेवारी रोजी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन या चर्चांना पूर्णविराम दिला. “ठाकरेंचा निष्ठावंत सैनिक म्हणून माझी ओळख आहे. तुमच्या माध्यमातून (मीडिया) मला समजले की, मी नाराज आहे. भाजप किंवा शिंदे गटाच्या (शिवसेना) वाटेवर आहे. पण, या अफवा आहेत,” असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. त्यानंतर अवघ्या २४ तासांत त्यांचा सूर बदलला आहे. लांजा येथे माध्यमांशी संवाद साधताना राजन साळवी म्हणाले, “गेल्या काही दिवसांपासून प्रसार माध्यमांच्या माध्यमातून माझ्या प्रवेशासंदर्भात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांचा आग्रह होता की, आपण यावे आणि संवाद साधावा. मी काल राजापूरमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तेव्हा सर्वांनी भावना व्यक्त केल्या की, माझ्यावर अन्याय झाला आहे. माझ्या पराभवाला अनेक मंडळी कारणीभूत आहेत. तुम्ही योग्य तो निर्णय घ्या, अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. त्यांना मीदेखील सांगितले की, मी योग्यवेळी योग्य निर्णय घेईन. आज लांजा येथील पदाधिकार्‍यांनी मला बोलावले होते. मी या ठिकाणीही आलो, कार्यकर्त्यांशी संवाद साधला. माझ्या भावना मी त्यांच्यापुढे व्यक्त केल्या. यावेळी निश्चितच भविष्यात योग्यवेळी योग्य तो निर्णय घेईन, असे मी त्यांना सांगितले आहे,” असे सूचक विधान करीत साळवी यांनी उद्धव ठाकरेंसह सर्वांनाच कोड्यात टाकले आहे.

पराभव कोणामुळे झाला?

“माझ्या पराभवाला काही वरिष्ठ मंडळी कारणीभूत आहेत. मी आज त्यांचे नाव घेऊ इच्छित नाही. मात्र, यामागे कोण आहे, हे शोधणे गरजेचे आहे. आज पक्षावर आणि माझ्यावरही दुःखाचा डोंगर कोसळला. यासाठी कोण कारणीभूत आहे, हे शोधले नाही, तर आता माझ्यावर जी वेळ आली, तीच वेळ भविष्यात आणखी कोणावर येऊ शकते. मात्र, अशी वेळ येऊ नये, यासाठी योग्य तो निर्णय घेतला पाहिजे आणि मी योग्य वेळी योग्य निर्णय घ्यायला सक्षम आहे,” अशी प्रतिक्रिया राजन साळवी यांनी दिली.