'मुक्काम पोस्ट देवाचं घर' च्या निमित्ताने पूजा सावंतचे स्वामी समर्थांना पत्र

04 Jan 2025 13:09:01
 
pooja sawant
 
 
मुंबई : आजच्या तंत्रज्ञानाच्या काळात पत्र लिहिणं दुर्मीळ झालं आहे. मात्र, पत्र लिहिणं हा अतिशय भावनिक असतं. अभिनेत्री पूजा सावंतनं स्वामी समर्थांना पत्र लिहून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. 'मुक्काम पोस्ट देवाचं घर' या चित्रपटाच्या निमित्तानं पूजानं स्वहस्ते पत्रलेखन करून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियात प्रसिद्ध केला आहे.
 
पूजा स्वतः स्वामीभक्त आहे. त्यामुळे पूजानं अत्यंत तळमळीनं स्वामींना पत्र लिहिलं आहे. त्यात पूजानं स्वतःसाठी काहीही न मागता अतिशय भावनिक मुद्दा मांडला आहे. मुक्या प्राण्यांची मदत करण्याची बुद्धी सर्वांना मिळावी, भूतदयेच्या कामात कधीही कमी पडणार नाही इतकं सक्षम करा, माझा पत्ता जरी सध्या बदललेला असला तरी मन मोकळ करण्याच्या निमित्ताने तुम्हाला पत्र पाठवण्याचा पत्ता मला मिळाला आहे अशी भावना पूजानं पत्रात व्यक्त आहे. त्यामुळे या पत्रातून पूजाचं प्राणीप्रेमही दिसून येत आहे.
 
मनीष कुमार जायसवाल आणि मंगेश देसाई यांनी 'मुक्काम पोस्ट देवाचं घर' या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. महेश कुमार जायसवाल, किर्ती जायसवाल हे या चित्रपटाचे निर्माते आहेत तर वैशाली संजू राठोड, सचिन नारकर, विकास पवार हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन संकेत माने यांचे असून संकेत माने, सुमित गिरी यांनी पटकथालेखन, सुमित गिरी यांनी संवादलेखन तर मंगेश कांगणे यांनी लिहिलेल्या गीतांना चिनार - महेश यांचे श्रवणीय संगीत दिग्दर्शन या चित्रपटाला लाभले आहे.
Powered By Sangraha 9.0