मी ‘शीशमहाल’ बांधला नाही; मात्र चार कोटी नागरिकांना घरे दिली
पंतप्रधान मोदी यांचा ‘आप’ सरकारवर घणाघात
04-Jan-2025
Total Views |
नवी दिल्ली : “देशातील नागरिकांचे जीवन सुखकर करणे, हेच केंद्र सरकारचे ध्येय आहे. त्यामुळेच मी सत्तेचा वापर चार कोटी नागरिकांना घरे बांधून देण्यासाठी केला, स्वतःसाठी ‘शीशमहाल’ बांधण्यासाठी नव्हे,” असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांनी शुक्रवार, दि. ३ जानेवारी रोजी आम आदमी पक्षाच्या (आप) सरकारवर नाव न घेता केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दिल्लीत विविध विकासकामांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी त्यांनी दिल्लीतील सत्ताधारी ’आप’ सरकारचे नाव न घेता चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, “आज संपूर्ण देश ’विकसित भारत’ घडवण्यात गुंतला आहे. ‘विकसित भारता’त देशातील प्रत्येक नागरिकाला पक्के छत आणि चांगले घर असावे, या संकल्पाने आम्ही काम करत आहोत. भाजपच्या केंद्र सरकारने झोपडपट्ट्यांच्या जागी पक्की घरे बांधण्याची मोहीम सुरू केली आहे. ज्या कुटुंबांच्या अनेक पिढ्या झोपडपट्ट्यांमध्ये राहत होत्या, ज्यांना कोणतीही आशा नव्हती, अशी कुटुंबे पहिल्यांदाच स्वतःच्या मालकीच्या पक्क्या घरांमध्ये राहण्यास जात आहेत. आज १ हजार, ५०० घरांच्या चाव्या देण्यात आल्या असून ही ’स्वाभिमान अपार्टमेंट्स’ गरिबांचा स्वाभिमान आणि प्रतिष्ठा वाढवणार आहेत. मोदींनी स्वतःसाठी कधी घर बांधले नाही, हे देशाला चांगलेच माहीत आहे. पण गेल्या दहा वर्षांत त्यांनी चार कोटींहून अधिक गरिबांसाठी घरे बांधण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. मलाही ‘शीशमहाल’ बांधता आले असते. मात्र, माझ्या देशवासीयांना कायमस्वरुपी घरे देणे, हे आपले स्वप्न आहे,” असे पंतप्रधान म्हणाले.
“एकीकडे केंद्र सरकार दिल्लीतील शिक्षण व्यवस्थेसाठी प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे राज्य सरकार उघडपणे खोटे बोलत आहे,” अशी टीका पंतप्रधानांनी केली. ते पुढे म्हणाले, “दिल्ली राज्य सरकारने विशेषतः शिक्षणासाठी असलेल्या निधीचे गैरव्यवस्थापन करून लक्षणीय नुकसान केले आहे. समग्र शिक्षा अभियानअंतर्गत दिलेला निधीही राज्य सरकारने मुलांच्या शिक्षणावर खर्च केला नाही. गेल्या दहा वर्षात भ्रष्टाचार वाढला असून मद्य घोटाळा, शालेय शिक्षण, गरिबांसाठीच्या आरोग्य सुविधा, प्रदूषण नियंत्रण आणि नोकर भरती अशा अनेक पातळ्यांवर विविध घोटाळे झालेले आहेत. काही कट्टर भ्रष्ट व्यक्तींनी अण्णा हजारे यांना पुढे करून दिल्लीला या संकटात ढकलले आहे. सत्ताधारी राज्य सरकार आपली आश्वासने पूर्ण करण्यात अयशस्वी ठरले आहे आणि परिस्थिती आणखीच बिघडली आहे आणि म्हणूनच, दिल्लीकर जनतेने या संकटाशी लढण्याचा निर्धार केला आहे, बदल घडवून आणण्याचा आणि शहराला या भ्रष्टाचारापासून मुक्त करण्याचा संकल्प केला आहे,” असेही पंतप्रधानांनी नमूद केले आहे.