धर्मनिरपेक्षतेच्या विकृत संकल्पनेद्वारे विद्ध्वंसक विचारप्रणालीस बळ

04 Jan 2025 13:23:23
Jagdeep Dhankhar

नवी दिल्ली : “हिंदू आणि सनातन संदर्भात भारतात उमटणार्‍या नकारात्मक प्रतिक्रिया आकलनापलीकडील आणि वेदनादायक आहे,” असे मत उपराष्ट्रपती जगदीप धनखड ( Jagdeep Dhankhad ) यांनी शुक्रवार, दि. ३ जानेवारी रोजी ‘जवाहरलाल नेहरू विद्यापीठा’त (जेएनयू) व्यक्त केले.

‘जेएनयू’मधील कन्व्हेन्शन सेंटर येथे वेदांताच्या २७व्या आंतरराष्ट्रीय काँग्रेसच्या उद्घाटनपर भाषणात उपराष्ट्रपती धनखड म्हणाले की, “आपली संस्कृती सर्वात प्राचीन संस्कृतींपैकी एक असून ती सर्व प्रकारे एकमेवाद्वितीय आहे. खेदाची गोष्ट म्हणजे या देशात सनातन आणि हिंदू धर्माविरोधात अनाकलनीय प्रतिक्रिया उमटत असल्याचे सध्या दिसते. खोली, त्याचा गहन अर्थ समजून न घेता, त्यावर कोणताही विचार न करता प्रतिक्रिया देण्याची प्रवृत्ती लोकांमध्ये दिसते,” असे ते म्हणाले.

“देशात काही लोक वेदांत आणि सनातनी ग्रंथांना प्रतिगामी मानतात. हा प्रकार अनेकदा विकृत वसाहतवादी मानसिकतेतून, आपल्या बौद्धिक वारशाच्या अपूर्ण ज्ञानातून निर्माण होतो. हे घटक नियोजित आणि भयानक पद्धतीने काम करतात. त्यांची मोडस ऑपरेंडी धोकादायक आहे. धर्मनिरपेक्षतेच्या विकृत संकल्पनेतून विद्ध्वंसक विचारप्रणाली पुढे नेली जात आहे, हे अत्यंत धोकादायक आहे. अशा घृणास्पद कृत्यांना संरक्षण देण्यासाठी धर्मनिरपेक्षतेचा वापर ढाल म्हणून केला जातो. अशा भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणे, हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे,” असेही उपराष्ट्रपतींनी नमूद केले आहे.

Powered By Sangraha 9.0