मुंबई (विशेष प्रतिनिधी) - कर्नाळ्यानजीकच्या कल्ले गावामध्ये 'आयब्रो थ्रश' म्हणजेच भुवई कस्तूर या दुर्मीळ पक्ष्याचे दर्शन झाले आहे (eyebrowed thrush). गेल्या आठवड्याभरापासून हा पक्षी कल्ले गावातील समाधान पवार यांनी तयार केलेल्या पक्षीनिरीक्षण परिसरात वावरताना दिसत आहे (eyebrowed thrush). स्थलांतरी असणाऱ्या या पक्ष्याच्या महाराष्ट्रातून तुरळक नोंदी आहेत (eyebrowed thrush).
सायबेरियामध्ये प्रजनन करणारा भुवई कस्तूर हा पक्षी हिवाळी हंगामात दक्षिणपूर्व आशिया आणि भारताच्या ईशान्येकडील भागांमध्ये प्रामुख्याने स्थलांतर करतो. मध्य आणि दक्षिण भारतामधील प्रदेशामध्ये तो फारसा दिसत नाही. अशा परिस्थितीत गेल्या आठवड्याभरापासून या पक्ष्याचे दर्शन कर्नाळ्यानजीकच्या कल्ले गावामध्ये होत आहे. याठिकाणी पक्षीनिरीक्षक समाधान पवार यांनी पक्षीनिरीक्षणाकरिता लपनगृह तयार केले आहे. याठिकाणी २३ डिसेंबर रोजी सर्वप्रथम हा पक्षी पवार यांच्या पत्नी सोनू पवार यांना दिसला. प्रथमदर्शनी हा पक्षी वेगळा वाटल्याने त्यांच्यासोबत पक्षीनिरीक्षण करणारे माधव आठवले यांनी त्याचे छायाचित्र टिपले. छायाचित्रावरुन या पक्ष्याची ओळख पटवण्यात आली. दरम्यानच्या काळात हा पक्षी त्याठिकाणी न दिसल्याने तो परिसर सोडून गेल्याची शक्यता होती. मात्र, समाधान यांना शुक्रवारी पुन्हा एकदा या पक्ष्याने दर्शन दिले.
नागपूर आणि खारघरमधील व्हॅली पार्कमधून भुवई कस्तूराची यापूर्वी नोंद करण्यात आली आहे. व्हॅली पार्कमध्ये सलग दोन वर्षे हा पक्षी हिवाळी हंगामात दिसला होता. हा कस्तूर सावलीच्या जागी राहणे पसंत करतो. त्याच्या बराच वेळ हा जमिनीवर उड्या मारण्यात व्यथित होतो. पालापाचोळ्यांमधून तो उड्या मारताना दिसतो. मऊ मातीमधील किडे आणि किटकांचा शोध घेण्यासाठी तो जमिनीवर उतरतो. त्याच्या डोळ्यावरच्या पांढऱ्या रंगाच्या भुवईसाठी हा पक्षी प्रसिद्ध आहे.