चुकून आलेल्या 'लाडक्या बहिणी'चे पैसे महिलेकडून परत
04-Jan-2025
Total Views |
धुळे : (Ladki Bahin Yojana) विधानसभा निवडणुकीच्या यशानंतर राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर निवडणुकांपूर्वी प्रचंड गाजलेली ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना पुन्हा चर्चेत आली. विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर या योजनेच्या अर्जांची पडताळणी होणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र आता महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः याची जाहीर घोषणा करत यावर शिक्कामोर्तब केले आहे. यानुसार राज्यभरात विविध ठिकाणी अर्जांची फेरपडताळणी सुरू करण्यात आली आहे. तेव्हाच या योजनेतील निकष डावलून लाभ घेतलेल्यांचे एक प्रकरण धुळे जिल्ह्यातून समोर आले होते. तेथील नकाने गावातील एका महिलेने शासनाचे निकष डावलून या सरकारी योजनेचा दुबार लाभ घेतल्याचे समोर आले होते. त्यामुळे त्या महिलेचे ७५०० रुपये परत घेण्यात आले होते, अशी बातमीही सर्वत्र पसरली होती.
मात्र अशातच आता या प्रकरणासंदर्भात नवा खुलासा झाल्याने वेगळीच माहिती समोर आली आहे. शासनाने आपल्याकडून पैसे परत घेतलेले नाही तर आम्हीच चुकीची कागदपत्रे दिल्याने आम्हाला पैसे मिळाले आणि ती चूक झाल्याचे आमच्याच लक्षात आले. त्यामुळे आम्ही स्वत:हून ते पैसे परत केल्याचे त्या महिलेने सांगितले आहे. प्रशासनाकडूनही या गोष्टीला दुजोरा देण्यात आला आहे. त्यामुळे त्या महिलेने स्वत:हून पुढे येत या योजनेचे पैसे परत केल्याचे स्पष्ट झाले आहे. एवढेच नव्हे तर ते पैसे परत केल्यानंतर त्या महिलेने पुन्हा लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला होता आणि त्या पात्र ठरल्यानंतर त्यांना आत्तापर्यंत ४५०० हजार रुपये देखील मिळाले आहेत, अशी माहितीही त्या महिलेच्या मुलाने दिली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
धुळे जिल्ह्यातील नकाने गावातील भिकूबाई खैरनार नावाच्या महिलेने या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज भरला पण त्यांच्या खात्यात पैसे न येता त्यांच्या मुलाच्या खात्यात पैसे जमा झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र या महिलेने स्वतः पुढे येऊन ही चूक मान्य केली आणि आतापर्यंत मिळालेले सर्व पैसे शासनाला परत केले. भिकूबाई यांनी चुकून त्यांच्या मुलाचे आधार कार्ड दिल्याने, त्या आधारकार्डला लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले होते. त्यामुळे शासनाकडून मिळालेले ७५०० रुपये हे त्यांच्या मुलाच्या बँक खात्यामध्ये जमा झाले होते. मुलाच्या बँक खात्यात लाडक्या बहिणीचे पैसे आल्याचं लक्षात आल्यानंतर भिकुबाई यांनी प्रशासनाकडे हे पैसे परत कारण्यासाठी अर्ज केला. जिल्हाधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणाची पडताळणी केल्यानंतर, या महिलेकडून ७५०० रुपये परत घेत शासनाकडे जमा केले आहेत. यानंतर योग्य कागदपत्र जोडून पुन्हा या योजनेचा लाभ त्यांना मिळत असल्याने त्यांनी शासनाचे आभार मानले.