मुंबईत दरवर्षी ५० किलोमीटर मेट्रोमार्ग सुरु होणार

मेट्रोंची कामे पूर्ण होण्याचे वेळापत्रक नव्याने तयार करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    04-Jan-2025
Total Views |

mmrda


मुंबई, दि.०४ : प्रतिनिधी 
मुंबई शहर आणि उपनगरातील कनेक्टिव्हीटी सुधारण्यासाठी आणि रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मुंबई आणि मुंबई उपनगरात विविध मेट्रो प्रकल्पांचे काम प्रगतीपथावर आहे. या मेट्रो प्रकल्पांचा आणि मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरु असणाऱ्या कामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला आहे.

शनिवार, दि.४ जानेवारी रोजी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, अप्पर मुख्य सचिव, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आयुक्त, मुंबई महापालिका आयुक्त व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहे.

या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक मेट्रो मार्गाचा आढावा घेतला. सद्यस्थितीत मुंबई उपनगरात सुरु असलेली सर्व मेट्रोंची कामे पूर्ण होण्याचे वेळापत्रक नव्याने तयार करा. कामांमध्ये विलंब चालणार नाही. अनेक ठिकाणी कारशेड शिवाय मेट्रो सुरू होत आहेत, त्यामुळे मेट्रो सुरू करण्यासाठी त्यासाठी थांबू नका. जगात असे प्रयोग होत आहेत, त्याचा अभ्यास करा भविष्यातील सर्व संभाव्य मेट्रो प्रकल्पांचा आढावा घेत, त्यासाठी कारशेडसाठी जागा आतापासूनच आरक्षित करा, असे आदेश यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना दिले. यासोबतच यंदाच्या वर्षात २२ किमी मेट्रो सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. मेट्रो-3 मुळे २०-२५ किमीची त्यात आणखी भर पडेल, म्हणजेच यंदाच्या वर्षी एकूण ५० किलोमीटरच्या मेट्रोचे जाळे मुंबईत विस्तारेल. इतकेच नाहीतर पुढच्या वर्षीपासून ५० किमी मेट्रो दरवर्षी सुरू होईल, हे सुनिश्चित करा, असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांंच्याकडुन एमएमआरडीएसमोर टार्गेट देण्यात आले आहे.


यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक आणि हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक यांच्या कामाचा आढावाही घेतला. या दोन्ही प्रकल्पांच्या वार्षिक देखभालीसाठी आराखडा आताच तयार करा, अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.