भाजप प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची स्पष्टोक्ती
04-Jan-2025
Total Views |
मुंबई : “बीडचे पालकमंत्रिपद हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे असून कोणाला पालकमंत्री करायचे याचा निर्णय त्या पक्षाने घ्यायचा आहे,” अशी स्पष्टोक्ती भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrashekhar Bawankule ) यांनी शुक्रवार, दि. ३ जानेवारी रोजी दिली.
माध्यमांशी संवाद साधताना मंत्री बावनकुळे म्हणाले, “बीड जिल्ह्यात घडलेली घटना अतिशय दुर्दैवी असून तपासयंत्रणांच्या कामावर, त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होईल अशा पद्धतीची वक्तव्ये कोणीही करू नयेत. तेथील पालकमंत्रिपद हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे असून कोणाला पालकमंत्री करायचे याचा निर्णय त्या पक्षाने घ्यायचा आहे. ’सामना’ दैनिकातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ’देवाभाऊ’ असा उल्लेख केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करीत, उशिरा का होईना, विकसित महाराष्ट्राचा संकल्प केलेल्या देवेंद्र यांचे अभिनंदन केले, यापूर्वीही त्यांना करता आले असते,” असे बावनकुळे म्हणाले.
केवळ सहा महिन्यांतच थेट परकीय गुंतवणुकीचा राज्यात उच्चांक झाल्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, “ही तर फक्त सुरुवात आहे. येत्या १०० दिवसांत आपल्याला अजून चांगले चित्र पाहायला मिळेल. ‘ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है’. ‘ईव्हीएम’संदर्भात उत्तम जानकर यांना काही प्रश्न असल्यास त्यांनी सुप्रिया सुळे यांचे मार्गदर्शन घ्यावे,” असा सल्लाही त्यांनी दिला.
प्रवास आणि संवादातून जनतेची नाडी समजते
“२०१४ ते २०१९ या काळात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून अतिशय चांगले काम केले आहे. राज्यातील प्रत्येक भागातील गोष्टींचे त्यांना बारकाईने आकलन आहे. प्रवास आणि संवाद केल्याने नेत्याला जनतेची नाडी समजते आणि त्यातूनच प्रशासनावर पकड तयार होते. मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पाला साथ देणारा महाराष्ट्र तयार करणे, हे सध्या देवेंद्र यांचे मुख्य उद्दिष्ट आहे,” असेही महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.