मागासवर्गीय समाज, गरीब वर्गाचे वास्तव्य जिथे मोठ्या संख्येने आहे, अशा ठिकाणी ख्रिस्ती मिशनरी टोळ्यांकडून धर्मांतरणाचे कुटिल षड्यंत्र अगदी राजरोसपणे राबविले जाते. अशा वंचित, उपेक्षितांना नेमके हेरुन, सेवा, शिक्षण व आर्थिक मदतीच्या माध्यमातून त्यांच्याशी तात्पुरती जवळीक साधून दिशाभूल केली जाते आणि त्यांचे ब्रेनवॉश करुन धर्मांतरण घडविले जाते. मुंबईमधील विक्रोळी पार्कसाईट परिसरातही गेले काही वर्षे ख्रिस्ती धर्मांतरणाचे असेच सुनियोजित षड्यंत्र अगदी पद्धतशीरपणे सुरु आहे. या विरोधात काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी जनजागृतीच्या माध्यमातून आपला आवाजही बुलंद केला आहे. त्यानिमित्ताने विक्रोळी पार्कसाईट परिसरातील धर्मांतरणाचे हे वास्तव उलगडणारा हा लेख...
मुंबईच्या पूर्व उपनगरातील विक्रोळी पार्कसाईट परिसरात बहुतांश मागासवर्गीय व गरीब वर्गाची मोठी वस्ती. बौद्ध, मातंग, धनगरांबरोबर उत्तर भारतीय, तेलुगू, कानडी व तामिळ भाषिक समाज इथे मोठ्या संख्येने वास्तव्यास आहे. दाट वस्तीक्षेत्र असलेल्या अशा ठिकाणी साहजिकच बेरोजगारी व अल्प उत्पन्नाने असंतुष्ट वर्गाचे प्रमाणही जास्त. त्याचप्रमाणे आजारपणाने त्रस्त असलेल्या रुग्णांची संख्याही या भागात जास्त प्रमाणात पाहायला मिळते. नेमक्या याच सामाजिक उणिवांचा अचूक अभ्यास करून, या परिसरातील ख्रिस्ती मिशनर्यांच्या धर्मांतरण करणार्या टोळ्या सक्रिय झालेल्या दिसतात.
एवढेच नाही तर पार्कसाईट परिसरातील बहुसंख्य हिंदू वस्तीक्षेत्रातील दहा सोसायटी क्षेत्रांत या टोळ्यांमधील मिशनरींनी प्रार्थनास्थळेही थाटली आहेत. या प्रार्थनास्थळांमध्ये मग धर्मांतरण करणार्यांना प्रार्थनेच्या नावाखाली एकत्र आणले जाते. सेवा, आर्थिक मदतीच्या माध्यमातून येणार्या अडल्यानडलेल्यांच्या समस्यांचे तात्पुरते समाधान केल्याचा एक दिखावा निर्माण केला जातो. येशूमुळेच या सगळ्या समस्यांवर समाधान मिळाले, अशी चलाखीने भ्रमपेरणी करुन येथील गोरगरीब जनतेला मग धर्मांतरणाच्या जाळ्यात अलगद ओढले जाते. ही कुटुंबेही मग या भूलथापांना, आमिशांना बळी पडून आपल्या चालीरिती सोडून ख्रिश्चन धर्मपरंपरांचा स्वीकार करतात. अशा धर्मांतरित कुटुंबात एकही हिंदू रित पाळली जात नाही. अगदी देवाचा प्रसाद खाणेसुद्धा त्यांना वर्ज्य आहे, असा द्वेष त्यांच्या मनात निर्माण केला जातो.
अशा या बहुसंख्याक हिंदू वस्तीक्षेत्र असलेल्या पार्कसाईट परिसरातील जवळपास दहा ठिकाणी ख्रिश्चन मिशनरींतर्फे प्रार्थनास्थळात धर्मांतरणाचा वेग अलीकडे वाढला आहे. ही धक्कादायक बाब निदर्शनास येताच, नीरज उपाध्याय, जयेंद्र जाधव, नीलम पांडे, माऊली वाघमोडे या स्थानिक रहिवाशी असलेल्या कार्यकर्त्यांनी याबाबत जनजागृती केली. या कार्यकर्त्यांनी मग ख्रिस्ती मिशनरींच्या धर्मांतरणाचे पितळ स्थानिकांसमोर उघडे पाडले. या सजग हिंदू कार्यकर्त्यांच्या विरोधानंतर पार्कसाईट परिसरात मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या ख्रिस्ती मिशनरींची दहापैकी सात प्रार्थनास्थळे बंद पाडण्यात आली. त्याचा राग म्हणून नीरज उपाध्याय, त्यांचे सहकारी आणि कुटुंबावरही या ख्रिस्ती मिशनरींद्वारे विविध स्तरातून दबावतंत्राचा अवलंब करण्यात आला. परंतु, पार्कसाईट परिसरातील स्थानिक हिंदू रहिवाशी त्यांच्यामागे पूर्ण ताकदीने उभे राहिल्याचे कळताच ख्रिश्चन मिशनर्यांचे धाबे दणाणले. ख्रिश्चन धर्मांतरण विरोधातील व्यापक जनजागृती बघता, त्या मिशनरी टोळ्यांपैकी एकाने त्याच्या सहकार्यांसह पर्यायी जागा शोधून पार्कसाईट येथील दुसर्या ठिकाणी ख्रिश्चन मिशनरी प्रार्थनास्थळे चालू ठेवलीच आहेत. सदर गंभीर बाब ही स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाला निदर्शनास आणून दिल्यानंतरही योग्य कारवाई व सहकार्य केले जात नसल्याची अथवा अशा लोकांवर कुठल्याही प्रकारचे गुन्हे दाखल केले जात नसल्याची खंत नीरज उपाध्याय व त्यांच्या सहकार्यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना व्यक्त केली. अशावेळी स्वयंप्रयत्नांनी हिंदू समाजात एकोपा राहावा, यासाठी पार्कसाईट येथील वस्त्यांमध्ये उपाध्याय व त्यांचे सहकारी हे वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत आहेत. यामध्ये साप्ताहिक हनुमान चालिसा पठण, रामनवमी, हनुमान जयंतीला भव्य रथयात्रा, संत पदयात्रांसारखे कार्यक्रम, तिथीनुसार शिवजयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती असे महापुरुषांचे कार्यक्रम आयोजित केले जातात. या महापुरुषांचे विचार समाजात रुजविण्याचा आणि हिंदूएकतेचा हा प्रयत्न नक्कीच स्तुत्य म्हणावा लागेल. त्यामुळे धर्मांतरणासारखी कुटिल षड्यंत्रे मूळापासून उखडून टाकण्यासाठी वस्ती पातळीवर हिंदू जनजागृतीचा शंखनाद होणे, ही आता काळाची गरज म्हणावी लागेल.
विक्रोेळीतील धर्मांतरणाचा प्रकार हा सर्वस्वी चिंताजनक
आपापल्या कुटुंबासह ख्रिश्चन मिशनरी विषयात काम करणारी टोळी विक्रोळी पार्कसाईटमधील गरीब हिंदूंच्या परिस्थितीचा फायदा घेऊन, आंतरराष्ट्रीय ख्रिश्चन संस्थांकडून पैसे घेऊन त्या पैशाने तात्पुरत्या स्वरूपात मदत करून फसवणूक करत आहेत. हे सर्वजण जन्माने जरी हिंदू असले, तरीही आपले नाव न बदलता पार्कसाईट येथील हिंदूंच्याच घरातील अडचणींचे सर्वेक्षण करतात आणि तात्पुरते सहकार्य करण्याचे ढोंग करून जाणीवपूर्वक ख्रिश्चन धर्मात त्यांना आणण्यासाठी काम करतात. हे सर्वजण काम करताना कुठल्याही प्रकारची भीती मनात ठेवत नाही. विरोध झाल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात आपले काम बंद करून कालांतराने धर्मांतरणाचे काम पुन्हा सुरु करतात. प्रशासनाकडून यांची गंभीर चौकशी करून हे काम करणार्या मुख्य टोळींवर दंडात्मक कारवाई केली पाहिजे. हा सर्व प्रकार विक्रोळी पार्कसाईटसह अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालू आहे व हे चिंताजनक आहे.
-जयेंद्र जाधव, स्थानिक कार्यकर्ता
धर्मांतरणाविरोधात प्रशासन व लोकप्रतिनिधींनी कारवाई करावी
विक्रोळी पार्कसाईट परिसरात आम्ही लहानपणापासून वास्तव्यास आहोत. धर्मांतरण हा विषय सदर ठिकाणी हा अनेक वर्षांपासून चालू आहे. पण, कालांतराने धर्मांतरण झालेल्यांची संख्या येथे अचानक मोठ्या प्रमाणात समोर येताच, आता येथील ख्रिश्चन धर्मात गेलेली लोक उघडपणे हिंदू धर्म व हिंदू धर्मियांच्या विरोधात तीव्रतेने काम करत आहेत. विक्रोळी पार्कसाईट परिसरात गरीब वस्त्यांमध्ये ख्रिश्चन धर्मांतरण करण्याच्या हेतूने या टोळीने योजनाबद्ध तयारी केली. त्यासाठी काही लोकांना सहकुटुंब सोबत घेतले व ख्रिश्चन मिशनरी प्रार्थनास्थळांत पार्कसाईट येथील अधिकाधिक लोकांना आणायची जबाबदारी त्यांना सोपावली आहे. भविष्यात येथे ही लोक आपली संख्या वाढवून सामूहिक धर्मांतरण करण्याचे उद्दिष्ट साध्य होण्यासाठी मोठे प्रयत्न करीत आहेत. अशा लोकांना आम्ही नेहमी सर्व स्तरातून विरोध करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या गोष्टींची तक्रार लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडेही आम्ही वेळोवेळी नोंदवली. परंतु, त्यांच्यावर केले जाणारे हे दुर्लक्ष भविष्यात विक्रोळी पार्कसाईट येथील हिंदूंसाठी संकटाचे मोठे जाळे आहे, असे स्पष्ट दिसून येते. हे सर्वजण कुठल्याप्रकारे काम करीत आहेत आणि कुठे काम करीत आहेत, याची आमच्याकडे पूर्ण माहिती आहे. परंतु, याची दखल प्रशासनाने योग्य पद्धतीने घेतली पाहिजे. अशा लोकांवर गुन्हे दाखल केले पाहिजे. या गोष्टी विक्रोळी पार्कसाईट येथे पुन्हा न घडाव्यात यासाठी कायमस्वरूपी अद्दल अशा जणांना घडायला हवी, म्हणून आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्नशील राहणार आहोत. हिंदूंच्या धर्मांतरणाविरोधातील हे कार्य करताना आंतरराष्ट्रीय ख्रिश्चन मिशनरी संस्थांकडून पैशाच्या जोरावर माझ्या विरोधात जरी गुन्हे दाखल केले असतील, तरीही मी व माझे सहकारी धर्मांतरणाविरोधातील जनजागृतीचे कार्य सातत्याने चालू ठेवू. प्रशासन व लोकप्रतिनिधी कधीतरी या गंभीर गोष्टीची दखल घेतील व कारवाई करतील, अशी आशा आहे.
-नीरज उपाध्याय, स्थानिक कार्यकर्ता
सागर देवरे