राष्ट्रनिर्मितीच्या भव्य मोहिमेत समाजानेही संघासोबत काम केले पाहिजे
सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे आवाहन
04-Jan-2025
Total Views |
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (RSS Malwa Prant Ghosh) "वैयक्तिक आणि सामूहिक दृष्टिकोनातून गुणांनी समृद्ध होऊन, 'मी आणि माझे' या भावनेपासून मुक्त होऊन शुद्ध आत्मीयतेच्या भावनेने देशाला आणि देशवासीयांना महान बनवण्याचे काम जेव्हा करावे लागेल तेव्हा असे वर्तन प्रत्येकाच्या आयुष्यात आले पाहिजे. संघाच्या राष्ट्रनिर्मितीच्या भव्य मोहिमेत समाजानेही संघासोबत काम केले पाहिजे." असे म्हणत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी संपूर्ण समाजाला समृद्ध भारत घडवण्यासाठी सक्रिय होण्याचे आवाहन केले आहे.
मालवा प्रांत येथे 'स्वर-शतकम' घोष प्रात्यक्षिक कार्यक्रम नुकताच संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. यादरम्यान प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर कबीर भजन गायक पद्मश्री काळूराम बामनिया, प्रांत संघचालक प्रकाश शास्त्री आणि विभाग संघचालक मुकेश मोढ उपस्थित होते.
उपस्थितांना संबोधत पुढे ते म्हणाले, संघातील कार्याची बांधिलकी आणि शिस्त पाळण्यासाठी संगीत म्हणजेच घोष यांचा संघात समावेश करण्यात आला होता. संघ स्वयंसेवकांनी मर्यादित साधनांसह घोष विकसित केला. भारतीय राग, जे मनाला आनंद देतात, कार्यकर्त्यांमध्ये शिस्त आणि चांगल्या कृतीची प्रेरणा देतात."
"संघाच्या स्वयंसेवकांनी केलेले घोष वादन हे निव्वळ देशभक्ती आणि संघ कार्याने प्रेरित आहे. संघाच्या आज्ञेवरून घोषवादन शिकणे, एकत्रित वादन करणे, एकाच प्रकारच्या रचनचे सांघिक वादन करणे, ही संघाची शिस्त आहे. संघघोष स्वयंसेवकांमध्ये चांगल्या सवयी वाढवतात. संघकार्याच्या व्रताला संयम आणि सातत्य देण्याचे साधनही घोष आहे.", असेही ते म्हणाले.
मालवा प्रांतातील सर्व २८ जिल्ह्यांतील एकूण ८६८ घोष वादकांनी पन्नास पेक्षा जास्त घोष रचनांचे पन्नास मिनिटांपेक्षा जास्त अविरत सादरीकरण केले. गेल्या सहा महिन्यांपासून स्वयंसेवकांनी मालवा प्रांतात विविध ठिकाणी वेणू, शंख, अनक, त्रिभुज, पानव, गौमुख, नागंग आणि तुर्या वादनाचे प्रशिक्षण घेत होते. 'स्वर शतकम' कार्यक्रमात हजारो सामान्य नागरिक व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
दंड आणि लाठी-काठी लढाईसाठी शिकवले जात नाही
संघाच्या कार्यक्रमांमुळे माणसातील सद्गुण वाढतात. संघात दंड आणि लाठी-काठी कशी चालवायची हे आपण शिकतो. ते लढाईसाठी शिकवले जात नाही, परंतु जर कुठली विपरीत परिस्थिती उद्भवलीच तर त्याचा उपयोग होऊ शकतो. दंड, लाठीकाठी शिकल्याने मनुष्याला शौर्य मिळते. तो घाबरत नाही.