"सभागृहात बीड प्रकरणावर चर्चा सुरु होती अन् वाल्मिक कराड पुण्यात..."; संदीप क्षीरसागर यांचा गौप्यस्फोट
04-Jan-2025
Total Views |
परभणी : सभागृहात बीड प्रकरणावर चर्चा सुरु असताना वाल्मिक कराड पुण्यात एका हॉस्पीटलमध्ये टीव्हीवर तमाशा बघत होता, असा गौप्यस्फोट शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केला आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ शनिवार, ४ जानेवारी रोजी परभणी येथे मुक मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
संदीप क्षीरसागर म्हणाले की, "गावातील एका बौद्ध समाजाच्या माणसासोबत पवन चक्की प्रकरणावरून हे कांड घडले आहे. त्या बौद्ध समाजाच्या माणसासोबत काही लोक दादागिरी करण्यासाठी आले होते. ती दादागिरी रोखण्यासाठी वाद सुरु झाले. त्यामुळे त्याला वाचवण्यासाठी मराठा समाजाचे संतोषअण्णा देशमुख तिथे गेले. ६, ९ आणि ११ या तीन दिवसांचा रेकॉर्ड काढून सीडीआर तपासल्यास अनेकजण पुढे येतील. ज्यांना अटक करण्यात आली ते सगळे फिल्मी स्टाईलने अटक झाली. परंतू, आता हा परळी पॅटर्न आपल्याला बंद करायचा आहे."
"सभागृहात सगळे या मुद्यावर बोलत असताना मास्टरमाईंड वाल्मिक कराड महाराष्ट्राच्या बाहेर नाही तर पुण्यात होते. २८ तारखेपर्यंत ते एका मोठ्या हॉस्पीटलमध्ये बेडवर बसून टीव्हीवर तमाशा बघत होते. ज्यावेळी बीडमधील लोक रस्त्यावर उतरले तेव्हापासून ते फरार झाले," असा दावा त्यांनी केला आहे.
ते पुढे म्हणाले की, "हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवा आणि जोपर्यंत हे प्रकरण सुरु आहे तोपर्यंत धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा घ्या. सीडीआरवर जो कोणी सापडेल त्याला डायरेक्ट फासावर चढवा," अशी मागणी संदीप क्षीरसागर केली.