मुंबई, दि.४ : प्रतिनिधी जोपर्यंत वायू प्रदूषण पूर्णपणे नियंत्रणात येत नाही तोपर्यंत ई विभागातील बांधकाम प्रकल्पांवरील निर्बंध कायम राहतील. वारंवार सूचना देऊनही निकषांची पूर्तता न करणा-या बांधकाम प्रकल्पांवर कठोर कार्यवाही करावी, असे स्पष्ट निर्देश मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत.
मुंबई महानगरातील वायू प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने कठोर नियमावली जारी केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ज्या परिसरांमध्ये हवा गुणवत्ता निर्देशांक वाईट अथवा अतिवाईट श्रेणीत आहे, तेथील बांधकामे सरसकटपणे पूर्णत: बंद करण्यात आली आहेत. यामध्ये भायखळा आणि बोरिवली पूर्व यांचा प्रामुख्याने समावेश आहे. बांधकामे थांबविल्यानंतर प्रत्यक्ष क्षेत्रावर काय स्थिती आहे, हे जाणून घेण्यासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी भायखळा येथील बांधकाम प्रकल्पांना बुधवार दि. १ जानेवारी रोजी अचानक भेट देत स्थळ पाहणी केली.
गगराणी यांनी संत गाडगे महाराज चौक (सातरस्ता) परिसरातील दोन खासगी इमारत बांधकाम प्रकल्पांना भेट दिली. तसेच, मुंबई सेंट्रल परिसरात बांधकामाधीन असलेल्या मेट्रो ३ प्रकल्पाची ठिकाणे, माझगाव येथील जोसेफ बाप्टिस्टा उद्यानाच्या नजीक डोंगरबाबा येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प आणि याच ठिकाणी असलेली बेकरी यांची पाहणी केली. त्याचप्रमाणे बाप्टिस्टा उद्यानालगत केंद्र शासनाचे भूविज्ञान मंत्रालय अंतर्गत आणि भारतीय उष्णदेशीय हवामान शास्त्र संस्था (पुणे) व बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या 'सफर' हवामान केंद्राची देखील पाहणी केली.
पाहणी दौ-याप्रसंगी गगराणी म्हणाले की, बांधकामाधीन इमारतीला चोहोबाजूंनी हिरवे कापड / ज्युट / ताडपत्रीने पूर्णपणे झाकून बंदिस्त केलेले असावे. संबंधित प्रकल्पांमध्ये देखील वायू प्रदूषण मोजणारी व वायू प्रदूषण नियंत्रण करणारी सर्व यंत्रणा कार्यान्वित असणे सक्तीचे आहे. सर्व यंत्रणा व उपाययोजना कार्यान्वित झाल्या म्हणून विशिष्ट प्रकल्पाला लगेच बांधकाम सुरू करण्याची परवानगी दिली जाणार नाही. संपूर्ण भायखळा (ई विभाग) परिसरातील वायू प्रदूषण नियंत्रणात येत नाही, तोवर निर्बंध कायम राहतील, याचा गगराणी यांनी पुनरूच्चार केला.