चला एकत्र येऊन राष्ट्र घडवूया! राज्यभरात भाजपचे प्राथमिक सदस्यता नोंदणी अभियान
आमदार रवींद्र चव्हाण : एकाच दिवशी २५ लाखांहून अधिक नोंदणी करण्याचा प्रयत्न
04-Jan-2025
Total Views |
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात येत्या ५ जानेवारी रोजी राज्यभरात प्राथमिक सदस्यता नोंदणी अभियान राबवण्यात येणार आहे. आमदार रवींद्र चव्हाण यांनी शनिवार, ४ जानेवारी रोजी पत्रकार परिषद घेत याबाबतची माहिती दिली.
यावेळी भाजप आमदार स्नेहा दुबे पंडित, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, भाजप नेते अतुल शाह यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. दरम्यान, आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या नेतृत्वात वसईतील विविध पक्षाच्या ३०० हून अधिक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.
याप्रसंगी बोलताना रवींद्र चव्हाण म्हणाले की, "भाजपमध्ये सहा वर्षातून एकदा संघटन पर्व होत असते. या पर्वात केंद्रापासून तर प्रदेशापर्यंत सर्व ठिकाणी प्राथमिक सदस्यता नोंदणी प्रक्रियेला सुरूवात होते. देशभरात वर्षभर संघटन पर्व सुरू आहे. परंतू, ज्या राज्यांमध्ये निवडणुका सुरू होत्या त्याठिकाणी संघटन पर्वाची सुरुवात झाली नव्हती. त्यामुळे महाराष्ट्रात निवडणुका संपल्याचा दुसऱ्या दिवशीपासूनच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील सर्व पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष आणि कार्यकर्त्यांना तात्काळ हे संघटन पर्व सुरू करण्याचे निर्देश दिले. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार प्राथमिक सदस्यता नोंदणी सुरू आहे."
"येत्या ५ जानेवारी रोजी सर्व मंत्री आणि आमदार आपापल्या भागात प्राथमिक सदस्यता नोंदणी अभियानात भाग घेणार आहे. महाराष्ट्रात दीड कोटी पेक्षा जास्त प्राथमिक सदस्य तयार करण्याचे लक्ष्य बावनकुळेजींनी ठेवले आहे. त्यामुळे प्रत्येक बुथवरच्या कार्यकर्त्यांनी अडीचशे पेक्षा जास्त सदस्यांची नोंदणी कशी होईल यासाठीची रचना करावी. तसेच प्रत्येक विधानसभेत ५० हजार पेक्षा जास्त सदस्य नोंदणीचे प्रयत्न करण्याच्या सूचना बावनकुळेजींनी दिल्या. त्यामुळे ५ जानेवारी रोजी प्रत्येक आमदार आपल्या मतदारसंघात प्राथमिक सदस्यता नोंदणी अभियानात भाग घेणार आहे," अशी माहिती त्यांनी दिली.
ते पुढे म्हणाले की, "राष्ट्राला समर्पित भावनेतून काम करणाऱ्या आणि जगभरात सर्वात जास्त प्राथमिक सदस्य असलेला एकमेव भाजप पक्ष आहे. या विचारधारेसोबत सर्वांना जोडायचे आहे. त्यासाठी १ तारखेपासून प्राथमिक सदस्यता अभियान सुरू झाले असून ते २० तारखेपर्यंत सुरू राहणार आहे. उद्या होणाऱ्या या अभियानात सर्वजण रस्त्यावर उतरून सदस्यता नोंदणी करणार आहे. एकाच दिवशी २५ लाख पेक्षा जास्त नोंदणी करण्याचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रातील सर्व नागरिकांनी या अभियानात सहभागी व्हावे," असे आवाहनही रवींद्र चव्हाण यांनी केले आहे.