होय मी नाराज! उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर राजन साळवींची प्रतिक्रिया

    04-Jan-2025
Total Views |
 
Rajan Salvi
 
मुंबई : विधानसभा निवडणूकीतील पराभवानंतर मी नाराज होतो आणि आहे. मी माझ्या भावना साहेबांपर्यंत पोहोचवल्या आहेत, अशी प्रतिक्रिया माजी आमदार राजन साळवी यांनी शनिवार, ४ जानेवारी रोजी उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर दिली आहे.
 
राजन साळवी उबाठा गटाला सोडचिठ्ठी देणार असल्याच्या चर्चा रंगल्या असताना शुक्रवार, ३ जानेवारी रोजी त्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेणार असल्याचे सांगत सूचक इशारा दिला होता. तसेच माझ्यावर अन्याय झाला आहे. माझ्या पराभवाला अनेक मंडळी कारणीभूत आहेत. तुम्ही योग्य तो निर्णय घ्या, अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्याचेही त्यांनी सांगितले होते. त्यानंतर त्यांनी शनिवारी मुंबईत उद्धव ठाकरेंची भेट घेतली.
 
हे वाचलंत का? -  "सभागृहात बीड प्रकरणावर चर्चा सुरु होती अन् वाल्मिक कराड पुण्यात..."; संदीप क्षीरसागर यांचा गौप्यस्फोट
 
या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना राजन साळवी म्हणाले की, "गेले दोन दिवस माझ्या मतदारसंघातील राजापूर तालुक्यातील कार्यकारिणीशी आणि सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाली. त्यांच्या भावना समजून घेतल्या. तसेच लांजा तालुक्यातील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या भावना समजून घेतल्या. त्यानंतर आज मी उद्धव ठाकरे साहेबांची भेट घेतली. मतदारसंघात ज्या घटना घडत होत्या आणि आमच्या पदाधिकाऱ्यांनी मला ज्या गोष्टी सांगितल्या त्यांच्या भावना मी उद्धव साहेबांपर्यंत पोहोचवल्या आहेत. त्यांनी माझ्या पराभवाला कारणीभूत असलेल्या घटना ऐकून घेतल्या आणि ते योग्य निर्णय घेतील, अशी मला अपेक्षा आहे."
 
"२००६ साली पोटनिवडणूकीत झालेला पराभव आणि २०२४ मध्ये झालेला पराभव यात खूप मोठा फरक आहे. २०२४ च्या निवडणूकीत झालेल्या पराभवाच्या भावना मला समजल्या. लोकांनी मला सांगितल्या. त्या पराभवाला कारणीभूत असलेल्या घटनांमुळे मी नाराज होतो आणि आहे. या भावना मी उद्धव साहेबांपर्यंत पोहोचवल्या आहेत. पदाधिकाऱ्यांच्या भावना, त्यांची मते मी उद्धव ठाकरेंकडे मांडल्या आहेत," असे त्यांनी सांगितले.