मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (RSS Dr. Krishnagopal News) "परकीय रानटी आक्रमणांमुळे गेली हजारो वर्ष नष्ट झालेल्या भारताच्या श्रद्धा आणि संस्कृतीची प्रतीके इंदूरच्या पुण्यश्लोक राणी अहिल्याबाई होळकर यांनी शोधून काढली व त्यांचा जीर्णोद्धार केला. जिथे गरज होती तिथे तीर्थक्षेत्रे आणि सांस्कृतिक केंद्रांचा नियोजनबद्ध विकास अहिल्याबाई होळकरांनी केला. त्यामुळे खऱ्या अर्थाने माता अहिल्याबाई होळकर या भारताच्या सांस्कृतिक उत्थानाच्या प्रणेत्या ठरल्या आहेत.", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह डॉ. कृष्णगोपाल यांनी केले. लोकमाता अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त राजस्थानच्या पुष्कर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या एका धार्मिक मेळाव्यात ते बोलत होते.
हे वाचलंत का? : राष्ट्रनिर्मितीच्या भव्य मोहिमेत समाजानेही संघासोबत काम केले पाहिजे
उपस्थितांना संबोधत पुढे ते म्हणाले, आपल्या अंत:करणात प्राणिमात्रांबद्दल अगाध ममता ठेवून, अहिल्यादेवींच्या न्याय आणि लोककल्याणकारी शासन पद्धतीमुळेच त्यांना लोकमाता म्हणून स्वीकारले. जीवनात अगणित संकटांचा सामना करूनही त्यांनी आपल्या कर्तव्याच्या मार्गापासून स्वतःला कधीच विचलित केले नाही. राज्यकारभाराचे काम शिवाची आज्ञा मानून धर्माच्या सन्मानाने राज्यकारभाराचे आदर्श उदाहरण मांडले."
यावेळी कार्यक्रमाचे विशेष अतिथी मानपुरा पीठाचे परमपूज्य जगतगुरु शंकराचार्य स्वामी ज्ञानानंदजी महाराज तर प्रमुख पाहुणे लोकमाता अहिल्याबाई होळकर यांचे वंशज उदयराजे होळकर होते. अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी उत्सव समितीचे संरक्षक रामनिवास वशिष्ठ व अध्यक्ष दशरथसिंह तंवर यांनी सर्व मान्यवरांचे स्मृतीचिन्ह व श्रीफळ देऊन स्वागत केले.