पुणे : पुणे फिल्म फाउंडेशन, सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन व दादासाहेब फाळके चित्रनगरी, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘२३ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ १३ ते २० फेब्रुवारी या कालावधीत ‘पीव्हीआर, पॅव्हिलियन मॉल, आयनॉक्स – बंडगार्डन आणि सिनेपोलीस-औंध’ येथे आयोजित करण्यात आला आहे.
या चित्रपट महोत्सवात जागतिक व मराठी चित्रपट स्पर्धात्मक विभाग आणि अन्य विभाग यांमध्ये सुमारे १५० हून अधिक देशी विदेशी चित्रपट रसिक प्रेक्षकांना पाहता येणार आहेत. राज कपूर यांची जन्मशताब्दी ही या वर्षीची या महोत्सवाची थीम असणार आहे.
जागतिक चित्रपट स्पर्धात्मक विभागात यंदा १०७ देशांमधील १०५० हून अधिक चित्रपटांनी सहभाग नोंदवला होता. परीक्षक मंडळाने हे सर्व चित्रपट बघून त्यातील १४ चित्रपटांची अंतिम फेरीसाठी निवड केली आहे. स्पर्धेत सर्वोत्कृष्ट चित्रपटाला ‘महाराष्ट्र शासन संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ – १० लाख रुपये देऊन गौरवले जाणार आहे. या महोत्सवासाठी नाव नोंदणी www.piffindia.com या संकेतस्थळावर दि. १५ जानेवारी पासून सुरु होणार आहे.