नववर्षातील नवीन तंत्रप्रवाह

    04-Jan-2025
Total Views |

AI Technology
 
वेगाने विकसित होणार्‍या तंत्रज्ञानाच्या पाऊलखुणांसह प्रत्येक वर्ष आपले योगदान देत असते. 2024 या वर्षानेदेखील तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात असेच आमूलाग्र बदल दिसून आले आणि 2025 या वर्षातदेखील तंत्रज्ञान क्षेत्रात नवप्रवाह लक्षवेधी ठरणार आहेत. त्यानिमित्ताने नववर्षातील नवीन तंत्रज्ञानाचा मांडलेला हा भविष्यवेध...
 
21व्या शतकाची सुरुवात होऊन आता 25 वर्षे झाली आहेत. तरीही, गेल्या 15-20 वर्षांत ज्याप्रकारे बदल झाले, तितके त्याआधीच्या 50 वर्षांतही झाले नव्हते, असे म्हणता येईल. संगणकीय क्रांतीचे परिणाम, स्मार्टफोनच्या रूपाने, मानवी जीवनाच्या विविध पैलूंवर झालेले परिणाम आपण पाहतो आणि अनुभवतोच आहोत.
 
इंटरनेटशी जोडलेल्या व्यक्तींची संख्या वाढेल, स्मार्टफोन अधिक स्मार्ट होतील, अधिकाधिक दैनंदिन व्यवहार नेटवरून केले जातील, सोशल मीडियाचे स्थान उंचावेल, माहितीची उपलब्धता आणि प्रमाण वाढेल. ‘नेटवर्क अकाऊंटेबिलिटी’, ‘अल्गोरिथमिक ट्रान्स्परन्सी’, ‘ऑटोमेशन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय)’, ‘प्रेटिक्टिव्ह अ‍ॅनालिसिस’ या आणि अशांसारख्या इतरही काही क्षेत्रांत महत्त्वाचे टप्पे गाठले जातील. यामुळे प्रत्येक ‘कनेक्टेड’ व्यक्तीच्या वैयक्तिक, व्यावसायिक आणि सामाजिक जीवनात होऊ घातलेल्या बदलांची दिशाही कायम राहील आणि सरकारी यंत्रणा व कार्यपद्धतींमध्ये ‘ई-गव्हर्नन्स’चे प्रस्थ वाढेल. यातून उद्भवणारे गोपनीयता, माहितीची सुरक्षितता, व्यक्तिगत आयुष्य व त्यासंबंधीची गुप्तता हे संवेदनशील मुद्दे सतत डोके वर काढत राहतील.
 
सध्याचे सर्वात चर्चेत असलेले ‘एआय’ (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) 2025 मध्ये अजून विस्तारेल. आज आपण ज्या ‘एआय’चा अनुभव घेत आहोत, त्याच्या तुलनेत भविष्यातील ‘एआय’ अधिक शक्तिशाली, अधिक बुद्धिमान आणि अधिक व्यापक असेल. भविष्यातील ‘एआय’ अधिक मानवी-सारखे वागणे शिकेल. ते भावना समजून घेण्याची, संदर्भावर आधारित प्रतिक्रिया देण्याची आणि जटिल सामाजिक संकेत समजून घेण्याची क्षमता विकसित करेल. आजचे ‘एआय’ मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या डिजिटल डेटाच्या आधारे अ‍ॅनेलिटिक्स करून निष्कर्ष काढते व शिकते. भविष्यातील ‘एआय’ स्वतःचा डेटा शोधून काढण्याची आणि त्यातून शिकण्याची क्षमता विकसित करेल.
 
‘रोबोटिक्स’ हा शब्द आपल्याला 1990 सालापासून माहीत असला, तरी त्याचा वापर व्यावहारिक पातळीवर मोठ्या प्रमाणात झालेला आढळून लागला आहे. गेल्या 10-20 वर्षांत रोबोंचा वापर सध्या प्रत्येकच क्षेत्रामध्ये केला जातो आहे. शस्त्रक्रियेपासून युद्धभूमीपर्यंत आणि स्वयंपाक करण्यापासून गटारे साफ करण्यापर्यंत, दूषित किंवा विषारी द्रव्ये गोळा करणे व ती वाहून नेणे अशासारख्या आपल्यासाठी अतिशय धोकादायक असलेल्या कामांसाठी तर रोबो आदर्शच म्हणावे लागतील. रोबोट्सना जास्त काम देऊया आणि ज्या कामाचा आपणास तिरस्कार वाटतो, त्यापासून सुरुवात करूया. उदा. शहरे स्वच्छ ठेवणे, अवघड जागी जाऊन कचरा शोधणे, अति शीत वा अति उष्ण वातावरणात वावरणे अशा ठिकाणी यंत्रमानव वापरणेच योग्य.
 
येत्या दहा वर्षांत स्मार्टफोन किंवा इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक साधनांशी संवाद साधणे अतिशय सुलभ होणार आहे. ‘टचस्क्रीन’ तर बहुतेक ठिकाणी आताच पोहोचला आहे. परंतु, साधनाशी थेट बोलण्याचे (व्हॉईस कमांड) प्रमाण खूपच वाढणार आहे. आपण टीव्हीशी देखील याप्रकारे बोलू शकू.
 
संगणकीय प्रणालींमध्ये साठवल्या जाणार्‍या सर्व प्रकारच्या माहितीच्या साठ्यामध्ये विलक्षण वाढ होईल. (याला ‘बिग डेटा’ असे म्हटले जाते) ही माहिती व्यवस्थित साठवणे, हवी तेव्हा योग्य तीच माहिती उपलब्ध करून देणे आणि तिचे सतत संपादन करणे हे अतिशय कौशल्याचे आणि कष्टाचे काम असणार आहे. या क्षेत्रातील कष्टांसाठी संगणकाच्या अफाट ‘प्रोसेसिंग कपॅसिटी’चा भरपूर वापर होणार असला, तरी शेवटी मानवी कौशल्यांची गरज भासणारच. त्यामुळे माहिती प्रक्रिया क्षेत्रामध्ये रोजगार वाढणारस हे नक्की. इतकी माहिती साठवण्यासाठी प्रत्येकाकडे संगणक असण्याची गरज मात्र राहणार नाही. ‘क्लाउड कम्प्युटिंग’ हा शब्दप्रयोग काही वाचकांना माहीत असेल. या तंत्रानुसार, वैयक्तिक पातळीवर साधने विकत घेण्याऐवजी, एका आभासी प्रणालीमध्ये सर्व माहिती साठवण्याची व ती वापरण्याची सोय केलेली असते. नजीकच्या काळातच औद्योगिक, वैयक्तिक तसेच इतर पातळ्यांवरचे विविध प्रकारचे क्लाऊड तयार होतील व त्यामुळे परस्परसंवादाचे आणि व्यवहारांचे चित्रच बदलेल. बरे, प्रत्येकच साधन महासंगणकीय क्षमतेच्या दिशेने वाटचाल करीत असल्याने व्यवहारांची गती खूपच वाढेल. याचीच पुढची पायरी म्हणजे हार्डवेअर, सॉफ्टवेअर व इतर सबंधित बाबी तात्पुरत्या करारावर भाड्याने मिळू लागल्यामुळे त्या प्रत्येक व्यक्तीने वा कंपनीने विकत घेण्याची गरज राहणार नाही व तो पैसा इतरत्र वापरता येईल.
 
दैनंदिन व्यवहारातील अनेक विशेषतः ग्राहकोपयोगी वस्तूंवर छोटे संवेदक (सेन्सर्स) बसवून त्यामार्फत वस्तूंच्या वापराबद्दलची माहिती मिळवली जाण्याचे प्रमाण वाढेल. असेच संवेदक निवासी तसेच, कार्यालयीन इमारतींमध्येही बसवून पर्यावरणविषयक माहिती मिळवली जाण्याचे प्रमाणही वाढते राहील.
 
गेल्या दोन-चार वर्षांत इंटरनेट हॅकिंग, स्पाईंगच्या अनेक घटना उघड झाल्या. वैयक्तिक माहितीच्या गोपनीयतेचे भविष्य तितकेच धुरकटलेले राहील. सोशल मीडिया सर्वाधिक असुरक्षित असल्याचे बहुसंख्यांचे म्हणणे आहे. शरीरावर चढवून किंवा शरीरात बसवून वापरण्याच्या इलेक्ट्रॉनिक साधनांच्या विश्वाला ‘वेअरेबल्स’ असे नाव आहे, हे वाचकांना माहीत असेल. येत्या वर्षांत असा वेअरेबल्सची संख्या वाढेल. यामधून ‘ग्लान्स मीडिया’ (नजरफेकीतून संवाद) आणि ‘कन्टिन्यूअस पार्शल अटेन्शन’ (निरंतर अर्ध-व्यवधान) या वर्तणुकीचे प्रमाण वाढेल. ही संकल्पना मूलतः फारशी महत्त्वाची वाटत नसली, तरी मानवी संवाद आणि सामाजिक परिमाणांच्या व परिणामांच्या संदर्भात तिच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. तसेच, वेअरेबल्सच्या वापरकर्त्यांना गरज असेल, तेव्हा तत्काळ माहिती पुरवण्याचे काही वेगळे मार्ग शोधले जातील. वेअरेबल्सच्या दुनियेत वैद्यकीय उपकरणांना मोठे स्थान आहे. कारण, त्यांच्यामुळे रुग्णाला प्रत्यक्ष दवाखान्यात जाणे बरेचदा टाळता येते. ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ ही संकल्पना, सूक्ष्मसंवेदक आणि बिनतारी नेटवर्क्सचा वापर करून उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील बहुतेक सर्व यंत्रे परस्परांशी थेट संवाद साधतील. उत्पादनविषयक आज्ञावली देण्यापासून उत्पादित मालाचा दर्जा तपासणे, इतकेच काय किरकोळ दुरुस्त्यादेखील बहुतेक यंत्रे स्वतःच करतील व प्रत्येक ठिकाणी माणसाला हात काळे करून घेण्याची गरज राहणार नाही. 2026 सालापर्यंत जगभरातील कित्येक दशअब्ज लहानमोठी मशिन्स अशा रितीने काम करतील, असा अंदाज आहे. आणखीही एका वेगळ्याच क्षेत्रात स्मार्ट मशिन्सचा वापर आता प्रभावीपणे करता येणार आहे. अन्नाची नासाडी टाळणे आणि खाद्यपदार्थांचा दर्जा उंचावणे. हल्ली सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांना, बारकोड आणि ठऋखऊ टॅग्ज लावून, त्यांच्या एकंदर ‘जीवनप्रवासा’चा मागोवा ठेवणे सहजशक्य झाले आहे. शहरांबरोबरच निमशहरी भागात दिसणारे मॉल आणि किराणामालाची मोठी दुकाने यांमधील फळे आणि भाज्यांपासून ब्रेड व गव्हाच्या पिशवीपर्यंत सर्वत्र आपल्याला बारकोडच्या चिठ्ठ्या लावलेल्या आढळतात. त्यामुळे एखादा अन्नपदार्थ कधी आणि केव्हा तयार झाला, कोणत्या गोदामात किती दिवस साठवला गेला, त्यावर काही प्रक्रिया केली गेली काय, अशा बर्‍याच बाबी त्यावर लावलेली ही चिठ्ठी वाचणार्‍या यंत्राद्वारे समजू शकतात. यामुळे गरजेनुसार आणि संबंधित मालाच्या टिकण्याच्या वा ताजे राहण्याच्या क्षमतेनुसारच तो मागवणे, त्याची वाहतूक करणे आणि तो साठवणे यांसारख्या घटकांवर नियंत्रण ठेवणे दुकानाच्या मालकाला सहज शक्य होते. परिणामी, मालाच्या मुदतसमाप्तीचा दिनांक (एक्स्पायरी डेट किंवा बेस्ट बिफोर डेट) पुढे ढकलणेही. विकले न गेलेले किंवा अनेक दिवस साठवलेले अनेक खाद्यपदार्थ, निव्वळ त्यांची मुदत संपल्याने, दररोज अक्षरशः फेकून द्यावे लागतात, हे आपण पाहतो. त्यामुळे जगभर वेगाने पसरलेल्या आणि प्रत्येकाच्याच हाती आलेल्या स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर करून अन्नाच्या नासाडीवर नियंत्रण ठेवून वितरण अधिक कार्यक्षम बनवता आले, तरी बरेच काम साध्य होईल अशा आशेलाही जागा आहे. संगणक आणि तत्सम उपकरणांशी कधीही संबंध न आलेले लोकही या संकल्पना सहजपणे वापरू शकतात, तेव्हा वाचकांनी हे आपले काम नव्हे, असे न मानता नवतंत्रज्ञानाचा स्वीकार करून स्वतःचे आयुष्य सुखी व सोयीस्कर बनवावे.
 
डॉ. दिपक शिकारपूर