परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र 'बॉस'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आनंदवार्ता; सहा महिन्यांतच ९५ टक्क्यांचा आकडा पार

    04-Jan-2025
Total Views |
Devendra Fadanvis

मुंबई : नेतृत्व योग्य व्यक्तीच्या हातात गेले, की चौफेर विकासाची दारे खुली होतात. महाराष्ट्र हे त्याचे ताजे उदाहरण. राज्यातील उद्योगधंदे गुजरातला पळवले, अशी आवई विरोधक उठवत असताना, वार्षिक सरासरीच्या ९५ टक्के परकीय गुंतवणूक ( Foreign Investment ) अवघ्या सहा महिन्यांत आणत सत्ताधार्‍यांनी त्यांना चपराक लगावली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, दि. ३ जानेवारी रोजी महाराष्ट्रवासीयांना ही आनंदवार्ता दिली.

याविषयी माहिती देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “पुन्हा अतिशय आनंदाने सांगतो की, आपला महाराष्ट्र सातत्याने परकीय गुंतवणूक (एफडीआय) आकर्षित करण्यात अग्रेसर आहे. आता २०२४-२५ या आर्थिक वर्षातील सप्टेंबरला संपलेल्या दुसर्‍या तिमाहीची आकडेवारी आली आहे. त्यात अवघ्या सहा महिन्यांत १ लाख, १३ हजार, २३६ कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे. गेल्या चार वर्षांतील सरासरी पाहिली, तर १ लाख, १९ हजार, ५५६ कोटी रुपये वार्षिक गुंतवणूक महाराष्ट्रात आली. याचाच अर्थ संपूर्ण वर्षभराच्या ९४.७१ टक्के गुंतवणूक ही फक्त सहा महिन्यांत आली आहे. मी महाराष्ट्राचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. माझे सहकारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संपूर्ण मंत्रिमंडळाच्या नेतृत्त्वात आपल्या महाराष्ट्राची ही घौडदौड अशीच कायम राहील, अशी ग्वाही देतो. महाराष्ट्र आता थांबणार नाही!
दरम्यान, सहा महिन्यांतील परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिल्या स्थानी, तर कर्नाटक दुसर्‍या, गुजरात तिसर्‍या, दिल्ली चौथ्या आणि तामिळनाडू पाचव्या क्रमांकावर आहे.”

राज्याचा खरा विकास साधला जाईल

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शब्दाला पक्के राहत महाराष्ट्राला थेट परकीय गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवून दाखवले आहे. पूर्वीसारखी फक्त सेवा क्षेत्रात ही गुंतवणूक मर्यादित न राहता, उत्पादन क्षेत्रात ही गुंतवणूक येत आहे, ही अतिशय चांगली बाब असून त्यातून राज्याचा खरा विकास साधला जाईल.

रवींद्र वैद्य, ‘लघु उद्योग भारती’चे महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष