मुंबई : अभिनेत्री किआरा अडवाणी अभिनेता रामचरण सोबत आगामी दाक्षिणात्य चित्रपट 'गेम चेंजर' मध्ये झळकणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. देशभरातून ट्रेलरला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. सध्या याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रामचरण आणि किआरा बऱ्याच ठिकाणी फिरत असून अचानक तिची तब्येत बिघडल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. पण नेमकं काय झालं आहे कियाराला जाणून घेऊयात...
सततच्या व्यस्त शेड्युलमुळे कियाराची तब्येत अचानक बिघडल्यामुळे तिला डॉक्टरांनी घरी आराम करण्याचा सल्ला दिला आहे. तिला रुग्णालयात दाखल केले नसून केवळ आरामाचा सल्ला दिला आहे. मात्र, काही मिडिया रिपोर्ट्सने किआरा अडवाणी रुग्णालयात दाखल झाल्याचं सांगितलं. मात्र, हे सर्व काही चुकीचं असल्याचे सांगण्यात आले आहे. या सर्व प्रकरणावर कियाराच्या टीमकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 'किआराला रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं नाही. व्यस्त शेड्युलमुळे आलेल्या थकव्यामुळे तिला आराम करण्याचा सल्ला दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून ती सलग कामच करत आहे यासाठी तिला आता रेस्ट घेण्यास सांगण्यात आलं आहे."
दरम्यान, किआरा आणि रामचरण यांचा ‘गेम चेंजर’ हा चित्रपट १० जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. तसेच, किआरा या चित्रपटाव्यतिरिक्त हृतिक रोशन आणि ज्युनिअर एनटीआरसोबत 'वॉर २' मध्येही झळकणार आहे.