गोस्वामी तुलसीदासांचे ‘रामचरितमानस’

    04-Jan-2025
Total Views |

गोस्वामी तुलसीदास
 
भारतीय संतपरंपरेतील संत शिरोमणी, थोर रामभक्त गोस्वामी तुलसीदास यांचे उत्तर भारतातील योगदान अपूर्व व ऐतिहासिक आहे. त्यांचे ‘रामचरितमानस’ हिंदुस्थानमधील संस्कृतीत जागरणाचे अधिष्ठान आहे. “संत तुलसीदास झाले नसते, तर उत्तर भारतात आज जी हिंदू धर्म तीर्थक्षेत्रे, शिल्लक आहेत ती राहिली नसती,” अशा शब्दांत त्यांच्या कार्याचे ऐतिहासिक महत्त्व पाश्चात्य विद्वान संशोधक सर जॉर्ज ग्रियर्सन यांनी अधोरेखित करून ठेवले आहे. ‘रामचरितमानस’ अशा अनेक काव्यरचनांतून गोस्वामी तुलसीदासांनी श्रीराम आणि हनुमानाचे गुणसंकीर्तन केले. भक्ती आणि शक्तीचे मंगल भावजागरण करीत हिंदू समाजातील स्वत्व स्वाभिमानाचे रक्षण केले. अशा ‘रामचरितमानस’मधील ‘रामदर्शन’...
 
पल्या देशाला वीरपुरुषांची आणि साक्षात्कारी संतांची थोर परंपरा आहे. भक्ती आंदोलनाद्वारे देशातील विविध प्रांतांतील, विविध भाषेतील, वेगवेगळ्या पंथ-संप्रदायाच्या साधुसंतांनी केलेले कार्य हे प्रामुख्याने पारमार्थिक-धार्मिक असले, तर त्यांचे सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्य अपूर्व आहे. स्वदेश-स्वधर्म रक्षणार्थ या संतांचे योगदान ऐतिहासिक आहे. उत्तर भारताच्या अवध भूमीत पंधराव्या शतकात होऊन गेलेले थोर संत गोस्वामी तुलसीदास (इ.स.1511 ते 1623) हे एक अग्रणी संत शिरोमणी होते. महाराष्ट्रात ज्ञानदेव-तुकोबांचे अभंग जसे घरोघर ऐकू येतात. तसेच, उत्तर भारतामध्ये गोस्वामी तुलसीदासांच्या चौपाई, दोहे, पद यांचा नित्य गजर ऐकू येतो. गंगा-शरयूच्या घाटाघाटवर, मठ-मंदिरांमध्ये तुलसीदास वाणी कानी पडते. ‘रामचरितमानस’मधील तुलसीदास विरचित पुढील चौपाई ‘रामायण’ टीव्ही मालिकेमुळे जगभर निनादलेली आहे.
 
सीता राम चरित अति पावन। मधुर सरस अरू अति मनभावन॥
पुनि पुनि कितवेहू सुने सुनाये। हिय की प्यास बुझत न बुझाये॥
बंदऊं बालरूप सोई रामू। सब सिधि सुलभ जपत जिसु नामू॥
मंगल भवन अमंगल हारी। द्रवहु सुदसरथ अजिर बिहारी॥
 
‘रामचिरतमानस’ हे हिंदी भक्तभाविकांमध्ये ‘भगवद्गीता’, ‘भागवत’ एवढेच पूज्य मानले जाते. संत गोस्वामी तुलसीदासांना ऋषी वाल्मिकीचा अवतार मानले जाते. ‘रामचरितमानस’ काव्याची रचना श्रीरामकृपेचा प्रसाद आहे. या काव्यग्रंथाला ‘तुलसी रामायण’ म्हणूनही ओळखले जाते. हिंदीतील अवधी भाषेत ही काव्य रचना असून, वाल्मिकी रामायणाप्रमाणेच यामध्ये ‘सात कांड’ आहेत. फक्त वाल्मिकी रामायणातील ‘युद्ध कांडा’ला तुलसीदासांनी ‘लंका कांड’ नाव दिलेले आहे. अयोध्या, वाराणसी (काशी) येथे या काव्यग्रंथांचे लेखन झाले असून, तुलसीदासांना हे लेखन करण्यास दोन वर्षे, सात महिने, 26 दिवस एवढा काळ लागला. श्लोक, चौपाई, सोरठ, दोहे अशा अनेक छंदांचा उपयोग तुलसीदासांनी केलेला आहे. इ.स.1574 मध्ये रामनवमीच्या मुहूर्तावर तुलसीदासांनी ग्रंथ लेखनास प्रारंभ केला आणि इ.स.1576 मध्ये मार्गशीर्ष महिन्यात ‘रामसीता विवाह’ दिनाच्या मुहूर्तावर ग्रंथ पूर्ण झाला. हिंदी भाषेतील सर्वश्रेष्ठ महान साहित्यकृती म्हणून ‘तुलसी रामायणा’चा गौरव देश-विदेशातील विद्वान संशोधक, अभ्यासक यांनी एकमुखाने केलेला आहे. त्यामध्ये सर जॉर्ज ग्रियर्सन, एडविन ग्रीव्हज्, कामिल बुल्के यांनी केलेला गौरव अधिक विशेष आहे. महात्मा गांधी, डॉ.राजेंद्र प्रसाद, राजगोपालाचारी यांनीही ‘भक्ती वाङ्मयातील सर्वश्रेष्ठ काव्य’ अशा शब्दात ‘रामचरितमानस’ चा महिमा गायलेला आहे.
 
संत तुलसीदासांचे जीवनचरित्रही मोठे विस्मयजनक आहे. असे म्हणतात की, जन्माच्या चौथ्या दिवशी बाळाला आईने टाकून दिले. मुनिया नावाच्या एका बाईने बालकाचे संगोपन केले. पण, वर्ष-दीड वर्षांत मुनिया दाईचे निधन झाले. मग अनाथ झालेल्या मुलाचा सांभाळ गुरू नरहरीदास यांनी केला. गुरू नरहरीदास हे रामानंद यांचे शिष्य होते. अशाप्रकारे रामानंद विचारधारेचा तुलसीदासांना वारसा लाभला होता. फक्त राम, राम म्हणतो म्हणून त्या मुलाचे नाव ‘रामबोला’ ठेवले होते. पुढे त्याचे उपनयन आणि दीक्षा झाल्यावर त्याचे नाव ‘तुलसीदास’ झाले. गुरूंनी उपवर होताच त्याचे लग्नही केले. त्यांची पत्नी ‘रत्नावली’ ही कवयित्री व आध्यात्मिक होती. एका प्रसंगी पत्नीच्या धिक्कारात्मक उपदेशाने तुलसीदास गृहत्याग करून रामभक्तीकडे वळले आणि सर्वश्रेष्ठ रामभक्त म्हणून विख्यात झाले. इ.स.1623 साली, वयाच्या 111व्या वर्षी गंगा घाटावर त्यांनी रामचिंतनात देह ठेवला.
 
‘रामचरितमानस’, ‘गीतावली’, ‘बरवै रामायण’, ‘विनय पत्रिका’ अशा विविध काव्य रचना-ग्रंथ तुलसीदासांच्या रामभक्तीचे विविधांगी दर्शन आहे. रामभक्ती आणि हनुमान स्तुतीने नटलेल्या या साहित्यकृती, भाविकभक्तांच्या उपासनेतील-आराधनेतील नित्यपाठाचे भक्तीसाहित्य आहे. पण, तुलसीदास म्हटले की, डोळ्यापुढे येते ते ‘रामचरितमानस’ आणि ‘हनुमान चालिसा’!
 
जय हनुमान ज्ञान गुनसागर,जय कपीस तिहूँ लोक उजागर ।
रामदूत अतुलित बलधामा, अंजनिपुत्र पवनसुत नामा ॥
 
अशी ‘हनुमान चालिसा’ बलोपासक हनुमानभक्तांचा सकाळ-सायंकाळचा नित्यपाठ आहे. रामनामाने तुलसीदासांनी समाजात ऐक्य निर्माण केले आणि हनुमान भक्तीने त्यांच्यात शक्तीचे तेज निर्माण केले. या भक्तीजागरणामुळेच धर्मांध परकीय जुलमी राजवटीत हिंदू समाज व धर्माचे रक्षण झाले. या भक्तीजागरणामुळेच धर्मांध परकीय जुलमी राजवटीत हिंदू समाज व धर्माचे रक्षण झाले.
 
‘सीताराम मय सब जग जानी।’ असे तुलसीदासांचे अवघे जीवन सीताराममय होते. ‘राम भजन सोहु मुक्ती गुसाई ।’ रामभजन हीच मुक्ती असा त्यांचा निष्ठाभाव होता. थोर संतचरित्रकार नाभादास यांनी ‘वाल्मिकी तुलसी भयो।’ असा तुलसीदासांचा गौरव केलेला आहे. महाराष्ट्रातील थोर संत एकनाथ यांनी जो भावार्थ रामायण ग्रंथ लिहिला त्याची प्रेरणा संत तुलसीदासांची वाराणसी येथे झालेली प्रत्यक्ष भेट होती.
 
तुलसीदासांची श्रेष्ठता, साक्षात्कारी विभुतीमहत्त्व लक्षात घेऊन बादशहा अकबराने त्यांना दरबारातील नवरत्नांमध्ये स्थान व मान देण्याची इच्छा व्यक्त केली. पण, हिंदू धर्माभिमानी थोर रामभक्त असलेल्या तुलसीदासांनी त्या सन्मानाचा व मोगल चाकरीचा विनयाने पण, ठामपणे ती ठोकरली. ‘हम चाकर रघुवीर के पटब लिखो दरबार । तुलसी अब का होई गे नर के मनसबदार ॥’ आम्ही प्रभु श्रीरामाचे दास आहोत-सेवक आहोत, त्यामुळे कोण्या मर्त्य सत्ताधिशाची दरबारी मनसबदारी कोण करील? असे बाणेदार उत्तर अकबर बादशहाला देणार्या गोस्वामी तुलसीदासांना कोटी कोटी प्रणाम!
 
॥ जय श्रीराम ॥
 
विद्याधर ताठे