लाडक्या बहिणीने पैसे केले परत! एकनाथ शिंदेंनी केलं अभिनंदन
04-Jan-2025
Total Views |
मुंबई : धुळे जिल्ह्यातील एका महिलेच्या खात्यात लाडकी बहिण योजनेचे पैसे न येता त्यांच्या मुलाच्या खात्यात पैसे जमा झाले. त्यामुळे त्या महिलेने स्वतः पुढे येऊन ही चूक मान्य करत आतापर्यंत मिळालेले सर्व पैसे शासनाला परत केले. या प्रामाणिकपणासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या लाडक्या बहिणीचे अभिनंदन केले आहे. त्यांनी शनिवारी माध्यमांशी संवाद साधला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "त्या माझ्या लाडक्या बहिणीला मी खूप खूप धन्यवाद देतो आणि तिचे अभिनंदन करतो. त्या बहिणीने त्यांच्या मुलाच्या खात्यात आलेले पैसे प्रामाणिकपणे परत केले. लाडक्या बहिणींच्या आशीर्वादानेच आमचे सरकार आले आहे. त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "विरोधकांना टीका करण्याशिवाय दुसरे काहीच काम नाही. लाडकी बहिण योजना सुरु केली तेव्हासुद्धा त्यांनी टीका केली. पैसे मिळणार नाहीत. हा चुनावी जुमला आहे, असे ते बोलत होते. पण आम्ही सहा हप्ते दिलेत. ही योजना बंद पाडण्यासाठी विरोधक कोर्टात गेले. पण कोर्टानेही त्यांना फटकारले. ते सुरुवातीपासूनच विरोध करत आहेत. त्यामुळे मी माझ्या लाडक्या बहिणींना सावत्र आणि दुष्ट भावांना त्यांची जागा दाखवण्यास सांगितले होते. त्यांनी विरोधकांना त्यांची जागा दाखवली आणि ते चारी मुंड्या चीत झाले. पात्र लाडकी बहिण या योजनेपासून वंचित राहणार नाही," अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.
बीड हत्या प्रकरणातील आरोपींची पाळेमुळे खोदणार!
"सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची घटना ही माणूसकीला काळीमा फासणारी आहे. यात एसआयटी आणि सीआयडीची व्यवस्थित चौकशी सुरु आहे. यातील एकही आरोपी सुटणार नाही. नाक दाबल्यावर तोंड उघडले याप्रमाणे फरार आरोपींची बँक खाती गोठवली आणि ते शरण आले. उरलेल्या आरोपींनाही पोलिस पकडतील. हे प्रकरण सरकारने गांभीर्याने घेतले आहे. ही केस फास्ट ट्रॅकवर घेऊन त्यात तज्ञ वकील लावून कोर्टाला विनंती केली जाईल. संतोष देशमुख यांची ज्या निर्घृणपणे हत्या झाली तेवढीच कठोर शिक्षा सर्व आरोपींना व्हायला हवी. सरकार या आरोपींची पाळेमुळे खोदल्याशिवाय राहणार नाही. आरोपींना फासावर लटकवण्याचा सरकारचा प्रयत्न असेल," असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितले.