गाव एक झालंय, आता आपला समाजही एक असायला हवा

माजी खासदार प्रदीप रावत यांचे प्रतिपादन

    04-Jan-2025
Total Views |

Bandhuta Parishad, Karad

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Babasaheb Ambedkar RSS)
"इतिहासाच्या महासागरात कोळसा घासायचा की चंदन, हे आपल्याला ठरवायचे आहे. खऱ्या अर्थाने आपल्या प्रत्येक कार्यात बंधुभावाचे पालन करून चंदनाचा सुगंध दरवळविण्याचा प्रयत्न करायला हवा. आपलं गाव एक आहे, पण आपला समाजही एक असायला हवा.", असे प्रतिपादन बंधुता परिषदेचे अध्यक्ष व माजी खासदार प्रदीप रावत यांनी केले.

हे वाचलंत का? : भारताच्या सांस्कृतिक उत्थानाच्या खऱ्या प्रणेत्या 'अहिल्याबाई होळकर'

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे दि. २ जानेवारी १९४० रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत आले होते. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ श्री भवानी संघस्थानी लोककल्याण मंडळ ट्रस्टच्या वतीने 'बंधुता परिषद' हा वैचारिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी आंबेडकरी विचारवंत क्षितिज टेक्सास गायकवाड, दलित महासंघाचे अध्यक्ष मच्छिंद्र सकटे, बुद्धिस्ट युथ ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष विजय गव्हाळे आदी मान्यवर पाहुण्यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारत आमदापुरे यांनी केले.

हिंदू संघटित झाल्याशिवाय जातिभेद नष्ट होणार नाही, असा विश्वास डॉ.आंबेडकरांना होता. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ “सकल हिन्दू, बंधु बंधु” या संकल्पनेने हिंदू संघटना म्हणून काम करत आहे. असे मत प्रदीप रावत यांनी व्यक्त केले. मच्छिंद्र सकटे म्हणाले, “माझ्या गावात लहानपणापासूनच अस्पृश्यतेच्या वेदना सहन करून मी बंधुत्वाच्या शोधात होतो. माझ्या सुरुवातीच्या आयुष्यात तथाकथित पुरोगामी लोकांकडून, बंडखोर लोकांकडून आणि डाव्या विचारसरणीच्या लोकांकडून दिशाभूल केल्याचा अनुभव मला आला. दलित समाजाला आणि संपूर्ण देशाला ढोंगी पुरोगामी लोकांपासून वाचवावे लागेल. जातिभेद नष्ट करण्यासाठी आणि बंधुभाव निर्माण करण्यासाठी आम्ही संघासोबत आहोत.

काँग्रेसच्या तत्कालीन नेत्यांनी डॉ.आंबेडकरांवर सर्वाधिक अन्याय केला असून आज याच पक्षाचे लोक संविधान वाचवाचा नारा देत असल्याचे क्षितीज गायकवाड यांनी म्हटले. विजय गव्हाळे म्हणाले, 'देशाच्या फाळणीच्या वेळीही बाबासाहेबांनी इस्लामचा धोका वारंवार सांगितला होता. फाळणीच्या विरोधात त्यांनी कठोर भूमिका घेतली होती. तत्कालीन काँग्रेस नेत्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे आज बांगलादेशात हिंदू आणि बौद्ध बांधवांवर अत्याचार होत आहेत. डॉ.बाबासाहेबांनी भारतीय परंपरेचा बौद्ध धर्म का स्वीकारला याचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे. बंधुत्वासाठी हिंदू समाजाला डॉ.आंबेडकर समजून घ्यावे लागतील.' परिषदेची सुरुवात बुद्ध वंदनेने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोककल्याण मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष विजय जोशी यांनी केले.