महाराष्ट्र सरकार उद्योजकांचे मित्र म्हणुन काम करेल - मंगल प्रभात लोढा

१७ व्या आयआयजेएस सिग्नेचर २०२५ चे दिमाखात उद्घाटन

    04-Jan-2025
Total Views |
 
lodha
 
  
 
मुंबई : "महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार हे उद्योजकांचे मित्र म्हणून काम करेल" असा विश्वास राज्याचे कौशल्यविकास, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केला. इंडियन इंटरनॅशनल ज्वेलरी शो सिग्नेचर २०२५ ( आयआयजेएस सिग्नेचर २०२५ )च्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. भारतीय हीरे व सोने दागिने निर्मिती क्षेत्रातील उद्योजकतेला आणि नवीन कल्पनांना उत्तेजन देण्यासाठी जेम अँड ज्वेलरी इक्सपोर्ट कौन्सिल ऑफ इंडिया (जीजेईपीसी) कडून दरवर्षी आयआयजेएस सिग्नेचर हे इक्झिबिशन आयोजित केले जाते. त्याचा उद्घाटन सोहळा मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई बीकेसी येथील जिओ इंटरनॅशनल कन्वेंशन सेंटर येथे पार पडला. ब्रिलियंट भारत ही यावर्षीची संकल्पना आहे.
महाराष्ट्र सरकार हे उद्योजकांचे मित्र म्हणून काम करेल. हीरे व सोने दागिने निर्मिती क्षेत्राच्या पाठीशी हे सरकार ठामपणे उभे आहे असे प्रतिपादन लोढा यांनी केले. या क्षेत्रातील रोजगार निर्मितीसाठी महाराष्ट्र सरकार आणि जीजेईपीसी संयुक्तपणे काम करेल आणि त्याबाबतचा प्रस्ताव जीजेईपीसी लवकरच सरकारकडे सादर करेल असे लोढा यांनी मुंबई तरुण भारतशी बोलताना सांगितले.
 
 
या उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून पु.ना. गाडगीळ ज्वेलर्सचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ आणि थायलंडचे व्यापार प्रतिनिधी उमेश पांडे उपस्थित होते. येत्या काळात जीजेईपीसी दागिने आणि हिरे व्यापार क्षेत्रातील कौशल्यविकासासाठी प्रयत्न करत आहे. त्यासाठी देशातील विविध भागात केंद्रांची निर्मिती करण्यात आली असून भविष्यात या क्षेत्रातली रोजगार निर्मिती वाढेल असे मत जीजेईपीसीचे अध्यक्ष विपुल शाह यांनी व्यक्त केले.
 
 

d 
 
 
 
आयआयजेएस सिग्नेचर हे लवकरच जगातील सर्वात मोठे ज्वेलरी इक्झिबिशन ठरेल - सौरभ गाडगीळ
 
 
आयआयजेएस सिग्नेचर हे हीरे व दागिने निर्मिती क्षेत्रातील जगातील पहिल्या क्रमांकाचे इक्झिबिशन ठरेल असे मत पु.ना.गाडगीळ ज्वेलर्सचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ यांनी व्यक्त केले. आयआयजेएस सिग्नेचर हे भारताची या क्षेत्रातील ताकद दाखवते. त्यामुळे या नव्या संकल्पनांच्या आधारावर भारत लवकरच जगातील बाजारपेठा काबीज करेल असे मत सौरभ गाडगीळ यांनी व्यक्त केले.
 
 
७ जानेवारी पर्यंत चालणाऱ्या या इक्झिबिशन मध्ये या क्षेत्रातील नव्या संकल्पनांची सादरीकरणे होणार आहेत. तसेच यामध्ये दागिन्यांच्या नव्या नमुने नागरिकांना पाहता येतील.