मुंबई (अक्षय मांडवकर) - सिंधुदुर्ग-कोल्हापूर जिल्ह्यात वावरणाऱ्या हत्तीच्या कळपातील निमवयस्क 'बारक्या' हा नर हत्ती आता स्वतंत्र झाला आहे (sindhudurg elephant). स्वतंत्र झाल्यापासून या हत्तीने चंदगड तालुक्यात बस्तान बसवले असून त्याचा सुसाट वेग हा ऊसाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे (sindhudurg elephant). आईपासून स्वतंत्र झाल्यानंतर 'बारक्या' आक्रमक झाला असून तो लोकांच्या अंगावर देखील धावून येत आहे (sindhudurg elephant). सिंधुदुर्गात जन्मलेले हत्तीचे हे पहिले पिल्लू आता स्वतंत्र आयुष्य जगण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. (sindhudurg elephant)
महाराष्ट्रातील सह्याद्रीचा विचार केल्यास या भूप्रदेशात एकूण आठ हत्ती आहेत. हे हत्ती सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यातील दोडामार्ग, चंदगड आणि आजरा या तीन तालुक्यामध्ये प्रामुख्याने अधिवास करतात. यामध्ये चार नर हत्ती, एक मादी आणि तीन पिल्लांचा समावेश आहे. त्यांचा आकार आणि वर्तणकीनुसार कोल्हापूर वन विभाग आणि स्थानिकांनी त्यांना 'अण्णा', 'राजा', 'गणेश', 'माई', 'बारक्या' अशी नावे दिली आहेत. तर दोडामार्गातील स्थानिकांनी याच हत्तींना वेगळी नावे दिली आहेत. ते 'अण्णा' या हत्तीला बाहुबली या नावाने, तर 'बारक्या'ला ओंकार या नावाने संबोधतात. हे हत्ती चंदगड आणि दोडामार्गात ये-जा करत असतात. 'अण्णा' हा सर्वात मोठा धिप्पाड टस्कर असून 'राजा' आणि 'गणेश' हे त्यापेक्षा थोडे छोटे टस्कर आहेत. 'अण्णा' आणि 'माई' मादीचे पहिले पिल्लू म्हणजे 'बारक्या' हा हत्ती. २०१७-१८ सालच्या दरम्यान या हत्त्तीचा जन्म दोडामार्गात झाला होता. त्यामुळे साधारण आठ ते नऊ वर्षांचा हा हत्ती आता आईपासून वेगळा झाला असून त्याने हेरे, पार्ले, गुळवडे, तिलारी या प्रदेशात ठाण मांडले आहे. 'गणेश' हा आजरा तालुक्यात आणि 'राजा' हा कळसगडे या भागात वावरत आहे.
- आपल्या कळपापासून वेगळा झाल्याने बारक्या प्रचंड आक्रमक झाला आहे.
- तो प्रचंड वेगवान असून त्याची उंची सात फूट आहे.
- ऊसाच्या शेतात शिरून त्यावर डल्ला मारण्यासाठी 'बारक्या' प्रसिद्ध आहे.
- या क्षेत्रात 'गणेश' आणि 'राजा' सारखे मोठे हत्ती असल्यामुळे देखील 'बारक्या' आपले स्थान निर्माण करण्यासाठी आक्रमक झाल्याची शक्यता आहे.
- 'माई' आणि 'अण्णा' यांच्यासोबत तीन पिल्ल आहेत.
- पिल्लांमधील मादी पिल्लू ही साधारण पाच ते सात वर्षांची असून दुसरी पिल्लं ही एक आणि तीन वर्षाची आहेत.
- मादी पिल्लू ही भविष्यात प्रजननास सक्षम झाल्यावर 'गणेश' किंवा 'राजा' टस्कर तिच्यासोबत मिलन करु शकतात.
नर हत्ती हे १२ ते १५ वयाच्या दरम्यान प्रजननास सक्षम होतात. या दरम्यान ते आपल्या कळपापासून स्वतंत्र होतात. स्वतंत्र झाल्यावर नर हत्तीचा आक्रमकपणा वाढतो. कारण, त्याच्या शरीरातील टेस्टोस्टेराॅनचे प्रमाण वाढते. तसेच इतर नर हत्तींच्या समोर त्याला आपले स्थान निर्माण करायचे असल्यामुळे देखील तो आक्रमक होतो. त्यामुळे कोल्हापूरातही बारक्या या हत्तीबाबत असेच काहीसे घडत असण्याची शक्यता आहे. - मैत्रयी भावे, संशोधक, भारतीय वन्यजीव संस्थान