मध्यमवर्गीयांना मिळावा देवी लक्ष्मीचा आशीर्वाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी

अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता

    31-Jan-2025
Total Views |

PM MODI
 
नवी दिल्ली : (PM Narendra Modi) देशातील प्रत्येक गरीब आणि मध्यमवर्गीय समुदायावर लक्ष्मीचा विशेष वरदहस्त असावा, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी केले आहे. त्यामुळे शनिवार दि. १ फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात देशातील मध्यमवर्गियांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
 
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास प्रारंभ झाला असून केंद्रीय अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी परंपरेप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांना संबोधित केले. ते म्हणाले, या अर्थसंकल्पीय अधिवेशनातून नवीन आत्मविश्वास आणि ऊर्जा निर्माण होईल, ज्यामुळे १४० कोटी नागरिक एकत्रितपणे हा संकल्प पूर्ण करतील. तिसऱ्या कार्यकाळात, सरकार भौगोलिक, सामाजिक किंवा आर्थिकदृष्ट्या सर्वसमावेशक विकासाच्या दिशेने मिशन मोडमध्ये वाटचाल करत आहे हे उद्धृत करताना नवोन्मेष, समावेशन आणि गुंतवणूक हे देशाच्या आर्थिक आराखड्याचा पाया असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. या अधिवेशनात अनेक ऐतिहासिक विधेयके आणि प्रस्तावांवर चर्चा केली जाईल, ज्यामुळे राष्ट्राला बळकटी देणारे कायदे तयार होतील. हे ध्येय साध्य करण्यासाठी या अधिवेशनात महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. जलद विकास साध्य करण्यासाठी पंतप्रधानांनी सुधारणा, कामगिरी आणि परिवर्तनाचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यसिद्धीसाठी राज्य आणि केंद्र सरकारांनी एकत्रितपणे काम केले पाहिजे आणि लोकसहभागाद्वारे परिवर्तन घडेल याकडे त्यांनी लक्ष वेधले.
 
तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवणाऱ्या देशातील जनतेबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना, पंतप्रधानांनी त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील हे पहिले पूर्ण अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्याचे निदर्शनास आणले आणि २०४७ पर्यंत, जेव्हा भारत स्वातंत्र्याची १००  वर्षे साजरी करेल, तेव्हा देश विकसित देश बनण्याचे ध्येय साध्य करेल असा विश्वास व्यक्त केला.
 
यंदा परकीयांच्या इशाऱ्यावरून गोंधळ नाही – काँग्रेसला सणसणीत टोला
 
२०१४ नंतर कदाचित हे पहिलेच संसदीय अधिवेशन असेल जिथे अधिवेशनापूर्वी परकीय स्रोतांकडून गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न झालेला नाही. गेल्या १० वर्षांपासून प्रत्येक अधिवेशनापूर्वी सातत्याने गोंधळ निर्माण करण्याचे प्रयत्न होत असून वातावरण भडकवण्यास तयार असलेल्या लोकांची कमतरता नाही. तथापि, गेल्या दशकातील हे पहिलेच अधिवेशन आहे जिथे कोणत्याही बाह्य कोन्यातून असा गदारोळ माजवला गेला नाही, असा सणसणीत टोला पंतप्रधानांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसला लगावला आहे.