केंद्र सरकारच्या एक दशकाच्या कारभारामुळे आर्थिक प्रगतीचा मार्ग प्रशस्त : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास प्रारंभ
31-Jan-2025
Total Views |
नवी दिल्ली : (Budget Session 2025) धोरणात्मक पक्षाघातासारख्या परिस्थितीतून अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी केंद्र सरकारने दृढ इच्छाशक्तीने काम केले आहे. केंद्र सरकारच्या एक दशकाच्या कारभारामुळे आर्थिक प्रगतीचा मार्ग प्रशस्त झाला आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या अभिभाषणामध्ये शुक्रवार दि. ३१ जानेवारी रोजी केले आहे.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास शुक्रवारपासून प्रारंभ झाला. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी परंपरेप्रमाणे संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित केले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या, धोरणात्मक पक्षाघातासारख्या परिस्थितीतून अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी केंद्र सरकारने दृढ इच्छाशक्तीने काम केले आहे. कोविड आणि त्यानंतरच्या परिस्थिती आणि युद्धासारख्या जागतिक चिंता असूनही भारतीय अर्थव्यवस्थेने दाखवलेली स्थिरता आणि लवचिकता तिच्या ताकदीचा पुरावा आहे, असे राष्ट्रपती मुर्मू यांनी म्हटले.
सरकारने दहा वर्षांत लिहिलेल्या प्रगतीच्या नवीन अध्यायांपैकी एक सुवर्ण पाऊल म्हणजे भारताची डिजिटल क्रांती होय, असे राष्ट्रपतींनी सांगितले. त्या पुढे म्हणाल्या, आज भारत डिजिटल तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एक प्रमुख जागतिक खेळाडू म्हणून आपली उपस्थिती निर्माण करत आहे. जगातील प्रमुख देशांसह भारतात ५जी सेवा सुरू होणे हे याचे एक मोठे उदाहरण आहे. जगातील अनेक विकसित देशही भारताच्या युपीआय तंत्रज्ञानाच्या यशाने प्रभावित झाले आहेत. आज भारतात ५० टक्क्यांहून अधिक रिअल टाइम डिजिटल व्यवहार होत आहेत. सामाजिक न्याय आणि समानतेसाठी सरकारने डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर एक साधन म्हणून केला आहे. डिजिटल पेमेंट हे काही लोकांपुरते किंवा विशिष्ट वर्गापुरते मर्यादित नाही. भारतातील सर्वात लहान दुकानदार देखील या सुविधेचा फायदा घेत आहे. बँकिंग सेवा आणि युपीआय सारखी जागतिक दर्जाची तंत्रज्ञान अगदी खेड्यांमध्येही उपलब्ध आहे. गेल्या १० वर्षात भारतात स्थापन झालेली पाच लाखांहून अधिक कॉमन सर्व्हिस सेंटर्स डझनभर सरकारी सेवा ऑनलाइन प्रदान करत आहेत, असेही राष्ट्रपतींनी यावेळी नमूद केले.