“५३ दिवसांपासून मी टार्गेटवर!”; भगवान गडाच्या दर्शनानंतर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया
31-Jan-2025
Total Views |
मुंबई : (Dhananjay Munde) “गेल्या ५३ दिवसांपासून मीडिया ट्रायलने मला सातत्याने टार्गेट केलं जात आहे. मागच्या या दिवसांत मी एकही शब्द मीडियामध्ये त्याप्रकारे बोललो नाही. त्यामुळे संकट ५३ दिवसांचं होतं”, असं वक्तव्य मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी दि. ३० जानेवारीला भगवानगडावर जाऊन दर्शन घेतले. भगवानडाचे महंत नामदेव शास्त्री यांचीही भेट घेतली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधताना संपूर्ण बीड प्रकरणावर आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणावर भाष्य केले.
काय म्हणाले धनंजय मुंडे?
संकट आणि संघर्षाच्या काळात गड माझ्यामागे उभा, ही माझ्यासाठी मोठी शक्ती. माझ्यावरचं संकट आज आलेलं नाही. गेल्या ५३ दिवसांपासून माझ्यावर संकट कायम आहे. मीडिया ट्रायलसाठी सातत्याने टार्गेट केलं जात आहे. मागच्या दिवसांत मी एकही शब्द बोललो नाही. त्यामुळे संकट ५३ दिवसांचं होतं. त्यामुळे या संकटातून बाहेर येण्यासाठी मी या भगवान गडावर येऊ शकलो असतो. पण मी आज त्या भावनेनं न येता मंत्री झालो आहे, त्या भावनेनं दर्शन घेण्यासाठी आलो. मी बाबांसोबत कोणतीही राजकीय चर्चा केली नाही.
राजकारण राजीनामा घेण्यासाठी की संतोष देशमुखांच्या न्यायासाठी?
राज्यात काही जणांकडून राजकारण सुरु आहे. ५३ दिवसांपासून मला टार्गेट केलं जातंय. हे राजकारण राजीनामा घेण्यासाठी की संतोष देशमुखांच्या न्यायासाठी? माझा राजीनामा की देशमुखांना न्याय मिळणं महत्त्वाचं आहे. पण माझं स्पष्ट मत आहे की या प्रकरणात जे कुणी आरोपी असतील त्यांना फाशीच झाली पाहिजे.’, असे धनंजय मुंडे म्हणाले.