स्वातंत्र्यवीर सावरकरांशिवाय मराठीचा विचार अशक्य !

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

    31-Jan-2025
Total Views |

MS1

मुंबई : "आपण ज्या वेळेस मराठीचा विचार करतो, त्यावेळेस स्वातंत्र्यवीर सावरकरांशिवाय मराठीचा विचार होऊ शकत नाही, कारण सावरकारांनी मराठीला शब्दांचा खजिना दिला तो अमूल्य आहे" असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. दिनांक ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी रोजी फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रांगणात तिसऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या उद्धाटनाचा सोहळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. या दरम्यान व्यासपीठावर उद्योग व भाषामंत्री उदय सामंत, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे उपस्थित होत्या. त्याच बरोबर ज्येष्ठ साहित्यीक मधु मंगेश कर्णीक, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे उपस्थित होते.

विश्व मराठी साहित्य संमेलनावर भाष्य करताना मुख्यमंत्री म्हणाले की "महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर पहिल्यांदाच येत्या फेब्रुवारी महिन्यात दिल्लीला मराठी साहित्य संमेलन पार पडतं आहे ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. साहित्य संमेलन, नाट्य संमेलन यामध्ये वाद होत असतात. आपण सगळे संवेदनशील लोक आहोत,त्यामुळे वाद प्रतिवाद झालाच पाहिजे, यातूनच विचारांचं मंथन घडतं. या मंथनातूनच चांगलं काही तरी निर्माण करण्याची प्रेरणा मिळते."

मराठी माणसाच्या वैश्विकतेवर भाष्य करताना मुख्यमंत्री म्हणाले की " जगाच्या पाठीवर असा कुठलाही देश नाही, जिथे मराठी माणूस पोहोचलेला नाही. त्यामुळे खऱ्या अर्थाने आजचं आपलं हे संमेलन वैश्विक झालेले आहे. भाषा हे भावना व्यक्त करण्याचं साधन आहे. अभिव्यक्तीतून सृजन करण्याचं साधन सुद्धा आपली भाषा असते. मराठी भाषा ही प्राचीन भाषा आणि अभिजात भाषा होतीच. परंतु कुठल्याही भाषेला राजमान्यता मिळणं महत्वाचं असतं. मराठी भाषेला राजमान्यता मिळण्याची सुरूवात जर कुणी असेल तर ती सुरूवात छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. मराठीची पाळंमुळं खोलवर या मातीत रूजलेली आहेत. आमची मराठी भाषा काही किलोमीटरवर बदलते, पण या भाषेची गोडी मात्र तशीच राहते किंबहुना वाढतच जाते. मराठीतील बोली भाषांनी सुद्धा आपली भाषा समृद्ध केली आहे. मराठी माणसाने कधीही केवळ स्वत:पूर्ता विचार केला नाही. मराठी माणसाने संपूर्ण राष्ट्राचा विचार केला. मराठी माणसातला हा वैश्विक विचार त्याला संत ज्ञानेश्वरांनी, संत तुकारामांनी दिला. मराठी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी तो त्याची गुणवत्ता जपतो, आहे ती व्यवस्था आणि आहे ते काम अधिक उत्तम करण्याचा प्रयत्न करतो. विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून जगभरातल्या मराठी माणसांना आपली भाषा टिकवायची आहे, समृद्ध करायची आहे अशी साद आपण घालत आहोत. "